PNB Tax Saver FD : सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकेत (PNB) ग्राहकांना ऑनलाइन मुदत ठेव योजनेचे खाते उघडण्याची संधी चालून आली आहे. पाच वर्षांची मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर बचतीचा मोठा फायदा ही मिळतो. ग्राहकांसाठी पीएनबीने खास टॅक्स सेव्हर एफडी (PNB Tax Saver FD Account) योजना बाजारात दाखल केली आहे. त्यामुळे व्याजासह तुम्हाला कर बचत असा दुहेरी फायदा मिळणार आहे. विशेष म्हणजे हे खाते अगदी सहज ऑनलाइन पद्धतीने उघडता येते. इंटरनेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंगच्या (Mobile Banking) मदतीने हे एफडी खाते ऑनलाइन उघडता येते. विशेष म्हणजे या मुदत ठेव योजनेत गुंतवणुकीसाठी तुम्हाला बँकेत जाऊन कागदपत्र जमा करण्याची कटकट नाही. तुम्ही 100 रुपयांच्या रकमेतून खाते सुरू करू शकता. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या खात्यात जमा झालेल्या पैशातून कर वाचवण्याची सुविधा आहे. खात्यात जमा झालेल्या पैशांवर तुम्ही कर वजावट घेऊ शकता.
कर बचत मुदत ठेवीत मिळणारे व्याज दर तिमाहीला वाढणार आहे. म्हणजे व्याजावरील व्याजात भर पडणार आहे. मात्र, हे पैसे एकरक्कमी पद्धतीने मुदत ठेव योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळतील. 5 वर्षांनंतर मुदत ठेव खात्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर ग्राहकाला त्यात भर घालून व्याज आणि मुद्दल मिळून रक्कम परत करण्यात येते. पंजाब नॅशनल बँक सध्या सर्वसामान्य गुंतवणुकदारांना 5.25 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 5.75 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. पीएनबीच्या कर्मचारी सदस्यांनाही 6.25 टक्के दराने तर निवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के दराने व्याज मिळणार आहे.
पीएनबी आपल्या कर्मचाऱ्यांना सामान्य जनतेपेक्षा 1 टक्का जास्त व्याज देते आणि हा नियम कर बचत करणाऱ्या एफडीला लागू होतो. हाच दर पीएनबीच्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांनाही दिला जातो. कर-बचत करणारे एफडी खाते वैयक्तिक खातेधारक, अनिवासी भारतीय, ज्येष्ठ नागरिक, संयुक्त खाते आणि अल्पवयीन मुलांसाठीचे खाते म्हणून उघडले जाऊ शकते. या खात्यावर कलम 80 सी अंतर्गत कर वजावटीची सुविधा दिली जाते.
– पीएनबी टॅक्स सेव्हर एफडी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे उघडता येते.
– ऑनलाइन खाते उघडायचे असेल तर इंटरनेट बँकिंग अकाउंटमध्ये लॉग इन करावे लागेल.
– एफडी खाते उघडण्याचा अर्ज जमा करावा लागेल.
– ज्यामध्ये मुदत ठेवीची रक्कम, कालावधी, नॉमिनेशनची माहिती आणि व्याज भरण्याचा पर्याय निवडावा लागेल.
– एफडीसाठी आपल्या बचत बँक खात्यातून पैसे आपोआप वळते (Auto Debit) केले जातील.
– एफडी पावती आपल्या ईमेलवर पाठविली जाईल.
– तुमचे केवायसी बँकेत जमा असल्याने तुम्हाला ओळख पटवण्यासाठीचे कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही.
5 वर्षांच्या कर बचत मुदत ठेव योजनेत किमान 100 रुपयांची गुंतवणूक करता येते. याहून अधिक रक्कम जमा करायची असेल तर 100 रुपयांच्या पटीत ती जमा करावी लागते. तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. हे खाते किमान 5 वर्षांसाठी असेल आणि त्यापूर्वी सदर खाते तुम्हाला बंद करता येणार नाही. अन्यथा तुम्हाला दीर्घकालीन व्याजाचा फायदा मिळत नाही आणि दंडही भरावा लागतो.