नवी दिल्ली : बँकेतील (Bank) खात्यात रक्कम पडून राहण्यापेक्षा तिचा सदुपयोग करणे कधीही फायद्याचे ठरते. गुंतवणुकीचा मंत्र (Money Investment) प्रत्यक्षात उतरविल्यास तुम्हाला जास्त जोखीम न घेताही चांगला परतावा मिळू शकतो. त्यासाठी योग्य नियोजन करणे फायद्याचे ठरते. बचतीतून समृद्धी येते, पण त्यासाठी अगोदर पैशाची गुंतवणूक करणे आवश्यक ठरते. पोस्ट खात्यातील या योजनांमध्ये तुम्हाला बँकेतील मुदत ठेवीपेक्षाही (Bank FD) अधिक परतावा मिळतो. पोस्टाच्या योजनांवर (Post Investment Scheme) सर्वसामान्य गुंतवणूकदार आजही विश्वास ठेवतात.
बँकेच्या एफडीपेक्षा पोस्ट खात्यातील बचत योजनांवर तुम्हाला अधिक परतावा मिळतो. अनेक राष्ट्रीय आणि मोठ्या खासगी बँका बचत योजनांवर कमी व्याजदर देत आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसतो. त्यांना बचत योजनांमध्ये मनासारखा, बाजार भावाप्रमाणे परतावा मिळत नाही. त्यामुळे ग्राहक चांगला परतावा देणाऱ्या पर्यायांच्या शोधात असतो.
पोस्ट खात्यातील काही योजनांवर केंद्र सरकारने तीन महिन्यांसाठी व्याजदरात वाढ केली आहे. त्याचा गुंतवणूक करताना मोठा फायदा मिळतो. सध्या पोस्ट खात्याच्या विविध बचत योजनांमधील व्याजदर जवळपास सर्वच बँकांपेक्षा जास्त आहे. गुंतवणूक करताना या योजनांचा विचार करता येऊ शकतो.
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम ही सर्वात लोकप्रिय योजना आहे. पोस्टाच्या अल्पबचत योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेत पाच वर्षांपर्यंत बचत करता येते. या पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर ग्राहकांना 6.7 टक्क्यांचे व्याज मिळते. ही योजना तुम्ही पुढे पाच वर्षांसाठी वाढवू शकता. त्यामुळे दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीवर जोरदार परतावा मिळतो.
पोस्टाने ज्येष्ठ नागरिकांसाठी पण बचत योजना सुरु केली आहे. यामध्ये सीनिअर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही योजना लोकप्रिय आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते. ही योजना तुमच्या बचतीवर 8 टक्के व्याज देते. या योजनेतील गुंतवणुकीवर कसलीही जोखीम नसते.
पोस्ट ऑफिस बचत योजनेतंर्गत विविध पर्याय उपलब्ध आहेत. बचत ठेव, आवर्ती ठेव, मुदत ठेव, मासिक योजना, बचत प्रमाणपत्रे इत्यादी. गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार या पर्यायांमधून निवड करू शकतात. आता तर गुंतवणूकदारांना ऑनलाईनही अर्ज करता येतो.
पोस्ट ऑफिस बचत खाते रोखीनेच उघडता येते. ग्राहकांसाठी आता धनादेश आणि एटीएमची सुविधाही देण्यात येते. हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरीत करता येते. बचत खात्यावर व्याजही मिळते.