दुरच्या प्रवासासाठी भारतीय प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात. दिवसभरात देशातील अनेक रेल्वे स्टेशन गर्दीने फुलून गेलेले असतात. लांबपल्यांच्या रेल्वेत तर खचून गर्दी असते. भारतीय रेल्वेने मोठी कात टाकली आहे. आता नवनवीन रेल्वे ताफ्यात येत आहे. नवीन रेल्वे लाईन सुरु होत आहे. रेल्वे अपघाताचे प्रमाण पण देशात दिसून येते. गेल्या दोन वर्षांत मोठ्या रेल्वे अपघाताने देशाला हदरवले आहे. 19 मे 2024 रोजी शालीमार एक्सप्रेसवर लोखंडी खंबा पडला. त्यात 3 यात्रेकरु जखमी झाले होते. रेल्वे प्रवाशांसाठी विम्याची सुविधा पण देते. अवघ्या 45 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा देण्यात येतो.
रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स
भारतीय रेल्वे, प्रवाशांसाठी रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स देते. विम्याचा लाभ त्या प्रवाशांना मिळतो. जे तिकीट बुक करताना विम्याचा पर्याय निवडतात. अनेक प्रवाशांना या विम्याविषयीची माहिती नसते. तिकीट खरेदी करताना हा विमा खरेदी करावा लागतो. तरच त्याचा फायदा प्रवाशांना मिळतो. या विम्यासाठी प्रवाशांना केवळ 45 पैसे मोजावे लागतात.
काय आहे हा विमा
रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स, रेल्वेचा प्रवास विमा, त्या प्रवाशांना मिळतो, जे ऑनलाईन तिकीट बुक करतात. जर कोणी प्रवाशी ऑफलाईन, म्हणजे तिकीट खिडकीवरुन तिकीट बुक करत असेल तर त्याला विम्याचा लाभ मिळत नाही. विमा घ्यायचा की नाही, हे पूर्णपणे प्रवाशांवर अवलंबून असते. प्रवाशाला वाटले तर तो विमा नाकारु पण शकतो. रेल्वे विम्यासाठी 45 पैसे प्रीमियम आहे. जनरल कोच वा डब्ब्यांतील प्रवाशांना विम्याचा लाभ देण्यात येत नाही. रेल्वे अधिनियम 1989 चे कलम 124 आणि 124 A अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम निश्चित होते.