मुंबई : राकेश झुनझुनवाला हे भारतीय शेअर बाजारात वर्चस्व असणाऱ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात अल्प गुंतवणुकीपासून सुरुवात केली आणि शेअर बाजारात दिग्गज गुंतवणूकदारांच्या यादीत प्रवेश केला. शेअर बाजारातून त्यांनी हजारो कोटींची कमाई केली. अखेरच्या श्वासापर्यंत शेअर बाजाराशी जोडलेल्या झुनझुनवाला यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेअर बाजाराला समर्पित केले म्हटले तरी वावगे ठरणार नाही. झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातील अनेक टिप्स गुंतवणूकदारांना सांगितल्या आहेत.
तुम्ही तोटा सहन करु शकत नसाल तर तुम्ही शेअर बाजारात नफा मिळवू शकत नाही. प्रत्येक गुंतवणुकीवर नफा मिळवणे अशक्य आहे. बाजारात व्यवहार करताना काही चुकीच्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते. कोणत्याही कारणातून नुकसान होऊ शकते, मात्र ते पचवण्याची ताकद ठेवा.
कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीच्या मूलभूत गोष्टी जरुर पहा. याशिवाय कंपनीच्या व्यवस्थापनाकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे. या दोन्ही गोष्टींची शहानिशा करुनच गुंतवणूक करायची की नाही,हे ठरवा.
जर तुम्ही भावनिक होऊन शेअर बाजारात गुंतवणूक केली तर तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो. भावनिक गुंतवणूक नुकसानास आमंत्रण देऊ शकते. यामुळे तुमच्या भावना बाजूला ठेवून गुंतवणूक करा. अपयशाकडे लक्ष देणे किंवा बाजारातील घडामोडी वैयक्तिक पातळीवर तुम्हाला गुंतवणूकदार म्हणून मदत करणार नाही.