नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : अनेकदा आपण उत्साहात भारतीय जीवन विमा महामंडळाकडून विमा (LIC Policy) खरेदी करतो. पण आर्थिक अडचण, पैशांची चणचण, आकस्मिक खर्चामुळे ही पॉलिसी बंद होते. नंतर ती सुरु करण्याची इच्छा नसते वा त्याचा विसर पडतो. आता तुम्हाला ही बंद पडलेली पॉलिसी सुरु करता येणार आहे. लॅप्स पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी एलआयसीने दिली आहे. ग्राहकांना पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी काही खास सवलत पण देण्यात येणार आहे. पण त्यासाठी फार मोठा कालावधी उरलेला नाही. ग्राहकांना या महिन्यातच हे काम पूर्ण करावे लागणार आहे. त्यांच्या हातात जवळपास 10 दिवस उरले आहेत.
विशेष मोहिम सुरु
एलआयसीने यावेळी लॅप्स पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी एक विशेष मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे. या मोहिमेनुसार, एलआयसी ग्राहक आरोग्य विमा योजना सुरु करु शकतात. त्यावर 4,000 रुपयांपर्यंत रक्कम बचत पण करु शकतात.
काय आहे लॅप्स पॉलिसी
एलआयसीची कोणती पण विमा योजना ही कमीत कमी 3 वर्षांपर्यंत सुरु ठेवणे आवश्यक आहे. या पॉलिसीचे नुतनीकरण केले नाही तर ही पॉलिसी लॅप्स होते. प्रत्येक पॉलिसीचा हप्ता भरण्यासाठी ड्यू डेट नंतर ही ग्राहकांना एक अतिरिक्त कालावधी देण्यात येतो. या कालावधीत विमाधारकाने हप्ता जमा केला नाही तर त्याची विमा पॉलिसी लॅप्स होते. थकलेली रक्कम आणि विलंब शुल्क, व्याज भरुन ही पॉलिसी ग्राहकाला सुरु करता येते. त्यासाठी एलआयसी वेळोवेळी मोहिम राबविते.
LIC’s Special Revival Campaign – An opportunity for policyholders to revive their lapsed policies #SpecialCampaign3.0@DFS_India @PMOIndia @DARPG_GoI pic.twitter.com/n4eoj3cJjR
— LIC India Forever (@LICIndiaForever) October 11, 2023
बंद पॉलिसी सुरु करण्यासाठी मोठी सवलत
एलआयसीने बंद पडलेली पॉलिसी सुरु करण्यासाठी एक विशेष मोहिम राबवली आहे. यामध्ये विलंब शुल्कावर 30 टक्क्यांची सवलत मिळत आहे. या पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या प्रीमियमनुसार ग्राहकांना वेगवेगळी सवलत मिळते. त्यामुळे ग्राहकांना पॉलिसी सुरु करताना थोडीफार मदत मिळते. पॉलिसी सुरु ठेवल्यास त्याला भविष्यातील लाभ लागू होतात.