PPF Scheme News | भारतात गुंतवणुकीसाठी टपाल खात्याच्या योजनांना (Post Office Scheme) नागरिक सर्वाधिक पसंती देतात. या योजनांसारखीच अजून एक योजना आहे. ती म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (Public Provident Fund) ही होय. ही योजना गुंतवणुकीवरील परताव्या (Return) बाबतीत जेवढी सुरक्षित समजली जाते. तेवढीच या योजनेतील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. इतर कोणत्याही योजनेतील गुंतवणुकीपेक्षा या योजनेत जास्त व्याज (Interest) मिळते. त्यामुळे या योजनेतही भारतीय गुंतवणूक करतात. या योजनेचा कमाल कालावधी 15 वर्षे आहे. ही योजना EEE श्रेणी अंतर्गत येते. याचा अर्थ तुम्हाला या योजनेत गुंतवणूक, व्याज परतावा आणि मॅच्युरिटी बेनिफिटवर कर सवलत लाभ मिळतो. पीपीएफ खाते किती जुने आहे आणि त्यात जमा केलेली रक्कम याआधारावर तुम्ही कर्ज घेण्यास आणि पैसे काढणे पात्र असाल. या योजनेची वैशिष्ट्ये पाहुयात.
या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रोढ आणि नाबालिक व्यक्तीला या योजनेत गुंतवणूक करता येते. या दोन्ही व्यक्ती PPF योजना खाते उघडू शकता. सध्या पीपीएफ खात्यात वार्षिक किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक मर्यादा आहे. जर तुम्ही पीपीएफ खात्यात वार्षिक 1.5 लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम गुंतवली तर तुम्हाला अतिरिक्त रकमेवर कोणतेही व्याज मिळणार नाही किंवा या रकमेवर तुम्हाला आयकर सूटही मिळणार नाही.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्याचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे आहे. मुदत संपल्यानंतर या योजनेत तुम्हाला गुंतवणुकीचा कालावधी वाढवता येतो. त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर पीपीएफ योजनेंतर्गत मुदत कालावधी पुढील पाच वर्षांसाठी वाढविला जातो. सरकार दर तिमाहीच्या सुरुवातीला पीपीएफवरील व्याजदर निश्चित करते. सध्या हा व्याज दर 7.1 टक्के आहे. या योजनेचा व्याज परतावा दरवर्षी 31 मार्च रोजी दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत पीपीएफ खाते उघडू शकता.
या योजनेतील गुंतवणुकीवर, लाभार्थ्याला आयकर कायदा 80C अंतर्गत आयकर सवलतीचा लाभ मिळतो. व्याजातून जो परतावा त्याला मिळेल, ते उत्पन्न पूर्णपणे कर मुक्त असेल. पीपीएफ खाते किती जुने आहे आणि त्यात जमा केलेली रक्कम याआधारावर तुम्ही कर्ज घेण्यास आणि पैसे काढणे पात्र असाल. गुंतवणुकीची सुरुवात केल्यापासून तिसऱ्या वर्षी ते सहाव्या वर्षाच्या दरम्यान पीपीएफ योजनेत गुंतवणूकदाराला कर्जासाठी अर्ज दाखल करता येतो. योजनेतंर्गत सातव्या वर्षी तुम्ही योजनेतंर्गत ठराविक रक्कम ही काढू शकता. परंतू, योजनेचा हप्ता तुम्ही चुकविला तर तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते. त्यामुळे वेळेवर हप्ता भरण्याची काळजी या योजनेत घ्यावी लागते. खाते बंद पडले तर विहित प्रक्रियेनंतर ते पुर्ववत सुरु करता येते.