नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : कोणतीही फिक्स डीपॉझिट म्हणजेच एफडी योजना ही गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय मानली जाते. गेल्यावर्षी महागाईत वाढ झाली होती. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेटमध्ये वाढ करीत लोकांवरील ईएमआयचं ओझं वाढविले होते. त्यावेळी देशातील अनेक बॅंकांनी एफडीच्या व्याज दरात वाढ केली होती. यात एसबीआय बॅंकेने अमृत कलश योजनेचे व्याज दर वाढविले होते. यात सात टक्क्यांहून अधिक व्याज मिळत आहे. ही योजना 15 ऑगस्ट रोजी संपणार होती. परंतू आता तिची डेडलाईन वाढविली आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनूसार स्पेशल फिक्स्ड डीपॉझिट स्कीम अमृत कलश एफडीमध्ये गुंतवणूकीसाठी मुदतवाढ दिली आहे. या योजनेची वाढती लोकप्रियता पाहून एसबीआयने एफडी स्कीमची डेडलाईन एक वेळ पुन्हा वाढविली आहे. आता गुंतवणूकदार 31 डीसेंबर 2023 पर्यंत या योजनेचा फायदा घेऊ शकतील. ही एसबीआयची स्पेशल एफडी योजना आहे ज्यात 400 दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागते.
एसबीआयच्या या स्पेशल एफडी स्कीममध्ये सर्वसामान्यांना 7.1 टक्के व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याज मिळते. या योजनेची शेवटची तारीख ही योजना लॉंच झाल्यानंतर आतापर्यंत दोनदा वाढविली आहे. या योजनेला स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने यंदा 12 एप्रिल रोजी लॉंच केले होते. आधी योजनेची डेडलाईन 23 जून 2023 पर्यंत होती. नंतर ग्राहकांचा प्रतिसाद पाहून ती 15 ऑगस्टपर्यंत वाढविली. आता पुन्हा त्यात वाढ करीत 31 डीसेंबर 2023 पर्यंत नागरीकांना गुंतवणूकीची संधी दिली आहे.
एसबीआयच्या या एफडी डीपॉझिट स्कीमवर मॅच्युरिटी व्याज, टीडीएस कापून ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते. टीडीएस इन्कम टॅक्सनूसार कापला जातो. अमृत कलश एफडी योजनेत दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत मुदतीआधी पैसे काढण्याची तरतूद आहे. खातेधारकांना मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक व्याज काढण्याची सोय आहे.
एसबीआयच्या अमृतकलश एफडी योजनेत आपले खाते उघडण्यासाठी 19 वर्षांपेक्षा अधिक वय हवे. तसेच आधारकार्ड, ओळखपत्र, वयाचा पुरावा, इन्कम प्रुफ, मोबाईल क्र., पासपोर्ट साईड फोटो आणि ई-मेल आयडी हवा. बॅंकेच्या शाखेत अर्ज भरून सर्व कागदपत्रांची प्रत आणि सुरुवातीला काही रक्कम भरुन खाते उघडता येते.