नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजार (Share Market) या महिन्यात जास्त व्यस्त असेल. पुढील आठवड्यात चार कंपन्यांचे इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) येत आहेत. यामध्ये मेदांता ब्रँड ग्लोबल हेल्थ लिमिटेड आणि माइक्रो फायनान्स लोन प्रोव्हायडर फ्यूजन माईक्रो फायनान्स लिमिटेड यांच्यासह एकूण चार कंपन्यांचा (Companies) समावेश आहे.
इतर दोन कंपन्यांमध्ये केबल आणि वायरलेस हार्नेस असेंबलीज तयार करणारी कंपनी डीसीएक्स सिस्टम्स आणि बीकाजी फूड्स इंटरनॅशनल यांचा सामावेश आहे. मर्चेंट बँकिंगच्या सूत्रानुसार, एकत्रितपणे या चार ही कंपन्या आयपीओच्या माध्यमातून 4,500 कोटी रुपये जमा करणार आहे.
तर बाजारात नोव्हेंबर महिन्यात यूनिपोर्टस इंडिया आणि फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स यांचे आयपीओ येण्याची ही दाट शक्यता आहे. याविषयीची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याविषयी अद्याप ठोस माहिती आलेली नाही.
डीसीएक्सचा आयपीओ 31 ऑक्टोबर रोजी उघडेल आणि 2 नोव्हेंबर रोजी बंद होईल. फ्यूजन मायक्रो फायनान्सचा आयपीओ 2 नोव्हेंबर रोजी उघडेल तर 4 नोव्हेंबर रोजी बंद होईल. ग्लोबल हेल्थ आणि बीकाजी फूड्स याचा आयपीओ 3 नोव्हेंबर रोजी उघडेल तर 7 नोव्हेंबर रोजी बंद होईल.
यावर्षी, 2022 मध्ये आतापर्यंत एकूण 22 कंपन्या त्यांचा आयपीओ घेऊन आल्या आहेत. या कंपन्यांनी शेअर बाजारातील विक्रीतून आतापर्यंत 44,000 रुपये जमा केले आहेत. गेल्या वर्षी 2021 एकूण 63 कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले होते. त्यामाध्यमातून 1.19 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.
आता तुम्ही म्हणाल आयपीओ बाजारात दाखल होत आहेत. पण बाजाराची स्थिती खरंच कशी आहे. तर जिओजीत फायनान्शियल सर्व्हिसेजचे प्रमुख विनोद नायर यांनी याचे उत्तर दिले आहेत. बाजाराची स्थिती कशी आहे याची माहिती त्यांनी दिली.
नायर यांच्या मते, बाजारात यंदा खूप चढ-उतार झाले. त्यामुळे हे वर्ष आयपीओ बाजारासाठी कमजोर राहिले. तर पुढेही परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळेच आकर्षक किंमतीत गुंतवणूकदारांना आयपीओत गुंतवणुकीची संधी मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.