मुंबई | 30 नोव्हेंबर 2023 : जगातील रहाणीमानाच्या दृष्टीने सर्वात महागड्या शहरांच्या यादीत सिंगापूर आणि ज्यूरीक या शहरांचा क्रमांक लागला आहे. त्यानंतर महागड्या शहरात जिनेव्हा, न्यूयॉर्क आणि हॉंगकॉंगचा समावेश झाला आहे. इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने ( EIU ) गुरूवारी ही महागड्या शहराची यादी जाहीर केली आहे. इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने रहाणीमानाच्या महागाईचे संकट अजून संपलेले नसल्याचे म्हटले आहे. रोजच्या वापरातील 200 हून अधिक वस्तू आणि सेवांच्या किंमतीत स्थानिक चलनदरानूसार सरासरी 7.4 टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी पेक्षा ( 8.1% ) ही वाढ कमीच असली तरीही साल 2017-2021 च्या तुलनेत ही वाढ खूपच जास्त म्हटली जात आहे.
अनेक श्रेणीत वाढलेल्या महागाईमुळे सिंगापूरने गेल्या 11 वर्षांमध्ये नऊ वेळा रॅंकिंगमध्ये महागड्या रहाणीमानात प्रथम क्रमांक कायम राखला आहे. कारच्या संख्येवर असलेले कठोर निर्बंध, जगात सर्वाधिक जास्त परिवहन साधनाच्या किंमती, अर्थात महागड्या कार यामुळे सिंगापूर महागडे शहर आहे. येथे कपडे, किराणा सामान आणि मद्याच्या किंमती देखील जास्त आहेत.
स्वित्झर्लंड देशातील सर्वात मोठे शहर झ्युरिक युरोपातील सर्वात श्रीमंत शहर म्हटले जाते. स्विस फ्रॅंकची ताकद, किराणाचे सामान, घरगुती सामान आणि मनोरंजनासाठी येथे मोठी किंमत मोजावी लागते. तर जिनेव्हा आणि न्यूयॉर्क संयुक्तरुपाने महागाईत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर महागाईत हॉंगकॉंगचा नंबर पाचवा आणि लॉसएंजिल्सचा सहाव्या क्रमांकावर आहे.
आशियात अन्य क्षेत्राच्या तुलनेत सरासरी किंमतीत कमी वाढ पाहीली जात आहे. चीन शहरांच्या रॅकींगमध्ये घसरण झाली आहे. चीनच्या नानजिंग, वूशी, डालियान आणि बीजिंग या चार शहरांचे आणि जपानच्या ओसाका आणि टोकीयो या शहरांच्या रॅकिंगमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.