नवी दिल्ली : आधार कार्डचा (Aadhaar Card) वापर आता प्रत्येक ठिकाणी आवश्यक झाला आहे. आधार कार्डची 12 अंकी संख्या ही भारतीय नागरिकांची ओळख आहे. आधार कार्ड आता केवळ ओळखपत्रापुरते मर्यादीत राहिलेले नाही. अनेक ठिकाणी त्याचा वापर होत आहे. तर पॅनकार्ड (Pan Card Linking) हे आपल्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा मांडते. पॅनकार्ड हे आपली आर्थिक कुंडली आहे. ही दोन्ही कार्ड जोडणीची चर्चा सुरु होती. त्यानंतर केंद्र सरकारने हे दोन्ही कार्ड जोडणीचे निर्देश दिले. भारतीय आयकर विभागाने त्यासाठी अधिसूचना काढली. आधारकार्ड-पॅनकार्ड जोडणीसाठी वेळोवेळी मुदत वाढ देण्यात आली. गेल्यावर्षीपासून सशुल्क मुदत वाढ देण्यात आली आहे. आता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी (Finance Minister) हे दोन्ही कार्ड जोडणी न करणाऱ्या नागरिकांना हा इशारा दिला आहे.
मुदतवाढ
यापूर्वी पॅनकार्ड आधार कार्ड जोडणीची अंतिम मुदत 31 मार्च 2023 होती. त्यानंतर ही तारीख वाढविण्यात आली. आता ही मुदतवाढ 30 जून पर्यंत आहे. तुम्ही अजूनही जोडणी केली नसेल तर लवकरात लवकर ही जोडणी करुन घ्या. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. घरबसल्या तुम्हाला ही प्रक्रिया करता येईल.
पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक अर्थात ही मुदतवाढ देताना केंद्र सरकारने नागरिकांना दंडाच्या रक्कमेतून कुठलीही सवलत मात्र दिली नाही. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांनी दंडाची रक्कम जास्त असल्याने जोडणीकडे पाठ फिरवल्याचा दावा करण्यात येत होता. तसेच ही दंडाची रक्कम माफ करण्याची विनंती करण्यात येत होती. पण 1000 रुपये भरल्याशिवाय या दोन्ही कार्डची जोडणी होणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. जर असे केले नाहीतर पॅनकार्ड निष्क्रिय होईल.
काय दिला इशारा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आधार कार्ड -पॅनकार्ड जोडणीबाबत दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना इशारा दिला आहे. त्यांचे मते, केंद्र सरकारने हे दोन्ही कार्ड जोडणीसाठी मुदत वाढ दिली आहे. पण त्याकडे अनेकांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर विलंब शुल्क आकारण्यात आले. 500, 1000 रुपये दंड घेऊन सध्या ही जोडणी होत आहे. आता नवीन दिलेल्या मुदतीत पण या दोन्ही कार्डची जोडणी झाली नाही तर दंडाची रक्कम आता वाढविण्यात येणार आहे. जून 2023 नंतर नागरिकांना जास्त भूर्दंड द्यावा लागणार आहे.
नियम काय
आयकर अधिनियमचे कलम 139 एए नुसार, प्रत्येक वापरकर्त्याला, ज्याने 1 जुलै, 2017 रोजी पर्यंत पॅनकार्ड जारी करण्यात आले आहे आणि त्यांच्याकडे आधार कार्ड आहे. त्यांनी आधार कार्ड-पॅन कार्ड लिकिंग करणे आवश्यक आहे. या नियमातून आसाम, जम्मू आणि काश्मीर, मेघालय या राज्यातील रहिवाशांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही. तसेच जे नागरीक 80 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यांनाही या प्रक्रियेतून सूट देण्यात आली आहे. तसेच जे भारतीय नागरीक नाहीत, त्यांना ही हे दोन्ही कार्ड लिंक करण्याची गरज नाही.