नवी दिल्ली : जून महिन्यात लखपती होण्याचा योग जुळून येत आहे. तुमचे नशीब जोरवर असेल तर येत्या तीन महिन्यात लॉटरी लागू शकते. भारतीय बँकांमध्ये हजारो कोटी रुपये (Unclaimed Amount) पडून आहेत. ही वडीलोपार्जीत रक्कम तुम्हाला पण मिळू शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील सर्वच बँकांना 100 दिवसांत 100 दाव्यांचा निपटारा करण्यास सांगितले आहे. विविध खात्यात पडलेली ही कोट्यवधी रक्कम खातेदारांच्या वारसदारांना परत करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. जून महिन्यापासून ही मोहिम सुरु होत आहे. कुटुंब प्रमुखाच्या खात्यातील पडून असलेली ही रक्कम व्याजासहित तुम्हाला मिळेल.
35,012 कोटी रुपये पडून
भारतीय बँकांमध्ये अनेक खातेदारांचा पैसा पडून आहे. खाते उघडल्यानंतर या खात्यात त्यांनी रक्कम जमा केली. काहींनी मुदत ठेव ठेवली. पुढे काही कारणाने त्याचा विसर पडला. अथवा खातेदाराचा मृत्यू झाल्यास ही रक्कम तशीच पडून राहते. देशातील अनेक बँकांमध्ये असे जवळपास 35,012 कोटी रुपये पडून आहेत. मार्च 2022 मध्ये ही रक्कम 48,262 रुपये होती.
विना दावा खात्याचं वारस कोण
बरेच जण घरच्यांना न सांगता, बँकेचे खाते उघडतात. त्यात काही रक्कम ठेव ठेवतात. काही वर्ष व्यवहार केल्यानंतर या खात्यात कोणताही व्यवहार होत नाही. देशात अशी अनेक खाते निष्क्रिय आहेत. या खात्यातील मोठ्या रक्कमा तशाच पडून आहेत. खातेदार हयात नसल्याने वा खात्याचा विसर पडल्याने त्यांनी या रक्कमेवर दावा सांगितलेला नाही. दहा वर्षांत या खात्यात रक्कम टाकण्यात आली नाही अथवा रक्कम काढण्यात आली नाही तर केंद्र सरकार त्याला अनक्लेम डिपॉझिट म्हणून जाहीर करते. आता पुरावा सादर केल्यास ही रक्कम परत मागता येईल.
100 दिवसांत 100 दावे
केंद्रीय बँकेने देशातील सर्वच बँकांना 100 दिवसांत 100 दावे हे अभियान सुरु करण्यास सांगितले आहे. त्यामुळे येत्या 100 दिवसांत प्रत्येक जिल्ह्यातील किमान 100 खात्यांच्या वारसदारांचा शोध घेण्यात येत आहे. या दावे न केलेल्या खात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्या वारसदारांचा शोध घेऊन त्यांना ही रक्कम परत करणे बँकांन अनिवार्य करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या वाडवडिलांची नावे आहेत का, याची माहिती घेण्यासाठी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर जावे लागेल.
कशी मिळेल रक्कम परत
प्रत्येक बँकेने निष्क्रिय खात्यांची एक यादी तयारी केली आहे. ही यादी तपासण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बँकेच्या वेबसाईटवर जावे लागेल. यादीत तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव आढळल्यास संबंधित शाखेत जावे लागेल. याठिकाणी एक अर्ज भरुन द्यावा लागेल. या क्लेम फॉर्म भरुन कागदपत्रे जोडावे लागतील. यामध्ये वारस असल्याची सिद्ध करणारी कागदपत्रे लागतील. मृत खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र वा दाव्याशी संबंधीत कागदपत्रे लागतील. रक्कम मोठी असल्यास घरातील सदस्यांची ना हरकत प्रमाणपत्र लागेल. विहित प्रक्रियेनंतर वारसदाराच्या खात्यात व्याजासहित रक्कम जमा करण्यात येईल.