नवी दिल्ली : तुमचं नोकरी करण्यात मन लागत नाही का? रोज ऑफिस ते घर या रहाटगाड्यात आता अधिक काळ फसायचं नसेल, तुमच्या नोकरीवर तुम्ही खूश नसाल तर तुम्हाला लवकर रिटायर होता येते. लवकर निवृत्तीसाठी (Early Retirement) योजना करावी लागेल. हा प्लॅन यशस्वी झाला तर तुमचे आयुष्य मजेत घालविता येईल. तुम्ही तुमच्या जीवनाचे पुष्पराज होऊ शकता. तुम्हाला पैशांची चणचण ही भासणार नाही. त्यासाठी पण एक खास प्लॅन तयार करावा लागेल. पाश्चिमात्य राष्ट्रात अनेक जण असे आयुष्य घालवितात. पण या सुखाच्या क्षणासाठी अगोदर मोठी किंमत चुकवावी लागते. मोठी मेहनत घ्यावी लागते. या प्लॅनला Fire Strategy असे म्हणतात.
पुष्पाची फायर स्ट्रेटर्जी
तर जीवनाचा पुष्पराज व्हायचे असेल तर त्यासाठी अगोदर मेहनत करावी लागेल. त्यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला कमाईतील 50 ते 70% भाग बचत करावा लागेल. खर्च कमी करावा लागेल. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. बचत लो-कॉस्ट इंडेक्स फंडमध्ये गुंतवावी लागेल.
लवकर निवृत्तीसाठी हवा किती पैसा
लवकर निवृत्तीसाठी किती पैसा लागेल? जर तुम्हाला तरुणपणीच निवृत्ती घ्यायची असेल तर तुमच्याकडे थंब रुल नुसार, रक्कम असावी लागेल. हा 4% नियम आहे. तुम्ही गाठीशी एक कोटी रुपये घेऊन निवृत्त झाला तर दरवर्षी साधारण तुम्ही या रक्कमेतील 4% उपयोगात आणू शकता. ही रक्कम 4 लाख रुपये असेल. या नियमानुसार, निवृत्तीनंतर तुम्हाला दरवर्षी किती रुपयांची आवश्यकता आहे. त्यानुसार, तुम्हाला अगोदरच रक्कमेची तरतूद करावी लागेल. म्हणजे तुम्हाला दरवर्षी 5 लाख रुपयांची गरज असेल तर तुमच्या निवृत्ती फंडात 1.25 कोटी रुपये असायला हवेत.
उत्पन्न वाढवा, बचत करा
लवकर निवृत्ती घ्यायची असेल तर तरुणपणीच कमाईची सुरुवात करावी लागेल. अधिक कमाईसाठी प्रयत्न करावे लागतील. या कमाईतील दरमहा 50 ते 70% टक्के रक्कम बचत करावी लागेल. महागाईत अधिक बचतीचा पर्याय योग्य वाटत नाही, पण जास्तीत जास्त बचत करण्यावर भर द्या. तुम्हाला लवकर रिटायर व्हायचे असले तर अधिक काम करावे लागेल. पार्ट टाईम जॉबचा पर्याय वा इतर उत्पन्न स्त्रोत शोधावे लागतील.
खर्च करा कमी
काही वाईट व्यसन असतील तर ते सोडावे लागतील. नवीन कार घेण्यापेक्षा जुनी कार वापरावी लागेल. सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा लागेल. घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याच्या घरात रहावे लागेल. रेस्टॉरंटमधील अधिकच्या फेऱ्या बंद कराव्या लागतील. नाहकचा खर्च टाळावा लागेल. ऑफर्सच्या भडीमार असला तरी नाहक खरेदीपासून वाचावे लागेल.
उत्पन्नाचा स्त्रोत
केवळ नोकरी वा इतर उत्पन्नावर अवलंबून न राहता. बचतीचा हा भाग तुम्हाला शेअर बाजार, म्युच्युअल फंड, मुदत ठेव, मालमत्ता भाड्याने देऊन, मध्यस्थ म्हणून काम करुन कमाविता येईल. हा उत्पन्नाचा स्त्रोत तुमच्यासाठी बहुउपयोगी ठरेल.
योग्य ठिकाणी गुंतवणूक करा
तुम्हाला लवकर रिटायर व्हायचे असेल तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर योग्य तज्ज्ञाचा सल्ला घेऊन गुंतवणूक करु शकता. जितक्या लवकर गुंतवणूक कराल. तेवढा तुम्हाला अधिक फायदा होईल. फायर स्ट्रेटर्जीनुसार ज्याठिकाणी चांगला परतावा आहे आणि जास्त जोखीम नाही, अशा ठिकाणी गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. अमेरिका आणि इतर विकसीत देशात लो-कॉस्ट इंडेक्स फंड अथवा एक्सचेंज ट्रेडेड फंडचा उपयोग करण्यात येतो. देशातही इंडेक्स फंड आणि ईटीएफ फंडमधील गुंतवणूक वाढत आहे.