नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने खात्यातील निश्चित रक्कमेविषयी एक महत्वाची सूचना दिली आहे. त्यानुसार, ग्राहकांनी त्यांच्या खात्यात बँकेद्वारे निश्चित केलेली शिल्लक रक्कम ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा खातेदारांना दंड भरावा लागेल. 1 मे, 2023 रोजीपासून हा नियम लागू होईल. त्यानुसार, खात्यात शिल्लक नसेल आणि ग्राहकाने एटीएम व्यवहार (ATM Transaction) केला तर त्याला या व्यवहारावर 10 रुपये + जीएसटी दंड (Penalty with GST) द्यावा लागेल. बँकेने त्यांच्या संकेतस्थळावर या नवीन नियमाची माहिती दिली आहे. बँकेने एसएमएसद्वारे अलर्ट पाठवला आहे. पण खात्यात रक्कम असतानाही एटीएममधून रक्कम निघाली नाही तर याविषयी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
कशी करता येईल तक्रार
खात्यात शिल्लक रक्कम असतानाही एटीएम मशीनमधून पैसे येत नसतील तर ग्राहक त्याविरोधात तक्रार दाखल करु शकतो. या तक्रारीवर बँकेला त्वरीत कार्यवाही करावी लागते. जर बँकेने एका महिन्यात अथवा 30 दिवसांत या समस्येचे समाधान केले नाही तर बँकेला, ग्राहकाला प्रत्येक दिवशी 100 रुपयांचा दंड द्यावा लागेल.
हेल्पलाईन नंबरवर करा तक्रार
एटीएम व्यवहार करताना मशीनमधून रक्कम आली नाही. काही तांत्रिक बाब, एटीएम मशीनमध्ये पुरेशी रक्कम नसेल, तर अशावेळी तुम्ही तक्रार करु शकता. पीएनबी ग्राहकांना याविरोधात टोल फ्री क्रमांक
1800180222 आणि 18001032222 यावर तक्रार नोंदविता येईल. याशिवाय ही बँक ग्राहकांकडून त्यांच्या सेवेबद्दल फीडबॅकही मागवत आहे. त्यासाठी बँकेच्या संकेतस्थळावर इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. बँकेच्या सेवांबाबत ग्राहकांना प्रतिक्रिया नोंदविता येईल. तसेच सेवांबाबत किती संतुष्ट आहे, त्याची प्रतिक्रिया नोंदविता येईल.
एटीएममधून आल्या फाटक्या नोटा
जर बँकेच्या एटीएममधून फाटक्या, तुटक्या नोटा येत असतील तर ही बँकेवर जबाबदारी निश्चित होते. अशा नोटा बदलण्याची जबाबदारी बँकेची असते. त्यामुळे एटीएममध्ये नोटा जमा करतानाच त्याची पडताळणी करणे हे बँकेचे काम असते.
जर नोटेचा अनुक्रमांक, महात्मा गांधींचा वॉटरमार्क आणि गर्व्हनरची शपथ दिसत असेल, तर बँकेला ती नोट बदलून द्यावी लागते. आरबीआयच्या नियमानुसार, एका व्यक्तीला जास्तीत जास्त 20 नोटाही बदलविता येतात. त्यांचे मूल्य 5000 रुपयांहून अधिकचे नसावे.
नोटा बदलविण्यासाठी व्यक्तीला अर्ज लिहावा लागेल. एटीएममधून किती तारखेला, वेळ नमूद करत किती रक्कम काढली याचा तपशील नोंदवावा लागेल. तसेच कोणत्या मूल्याची नोट फाटकी आली आहे त्यांचा उल्लेख आणि एटीएमची स्लीप जोडावी लागेल.
आरबीआयकडे इतक्या तक्रारी
आरबीआयने एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, केंद्रीय बँकेकडे 2021-22 या कालावधीत बँकांच्या विविध सेवांविषयीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एकूण 4,18,184 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तक्रारींमध्ये 9.39 टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकिंग लोकपाल कार्यालयाने यातील 3,04,496 तक्रारींची वर्गवारी केली आहे. यामध्ये 14.65 टक्के तक्रारी एटीएमसंबंधीच्या आहेत. तर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या 13.64 टक्के तक्रारी दाखल झाल्या आहेत.
या सर्व तक्रारींमधील 90 टक्के ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली (CMS) पोर्टल, ई-मेल आणि केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS) यासह डिजिटल माध्यमातून प्राप्त झालेल्या आहेत.