नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडणी कधीच अनिवार्य केली होती. पण केंद्र सरकारने वेळोवेळी त्यात मुदत वाढ दिली. पण गेल्या वर्षापासून केंद्र सरकारने कडक पाऊल उचलले. केंद्राने विलंब शुल्क आणि दंड वसूली सुरु केली. त्याचा लागलीच परिणाम दिसून आला. अनेक नागरिकांनी या दोन्ही कार्डची (Aadhaar Card-Pan Card Linking) जोडणी केली. पण अजूनही अनेक नागरिकांनी आधार कार्ड आणि पॅन कार्डची लिकिंग केलेली नाही. त्यामुळे मार्च महिन्यात पुन्हा नागरिकांना मुदतवाढीची सवलत देण्यात आली. आता जून महिन्यापर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. त्यानंतर नागरिकांसमोर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल.
आता संधी नाही
आयकर खात्याने (Income Tax) पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता 30 जून 2023 ही अंतिम तारीख केली आहे. त्यानंतर पॅनकार्ड बाद करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला बँकेचा व्यवहार, इतर व्यवहार करता येणार नाही. कारण यासर्व व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते. सध्या पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये दंड द्यावा लागतो. यानंतर नागरिकांना संधी देण्यात येणार नाही.
तर पॅन कार्ड निष्क्रिय
30 जूनपर्यंत दोन्ही कार्डची जोडणी न झाल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यानंतर जोडणी केल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड बसू शकतो. आयकर अधिनियमाच्या कलम 272बी अंतर्गत 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक हजार रुपयांचा दंड भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यामुळे ज्यांना हे दोन्ही कार्ड जोडायचे आहे, त्यांना सध्याची रक्कम भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
उदंड प्रतिसाद
केंद्र सरकारने यापूर्वी अनेकदा नागरिकांना संधी दिली. त्यानंतर गेल्या वर्षीपासून केंद्र सरकारने दोन्ही कार्ड जोडणीसाठी 500 रुपये शुल्क आकारले. तर जुलै महिन्यानंतर हे शुल्क एक हजार रुपये करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 51 कोटींहून अधिक नागरिकांनी पॅनकार्ड-आधारकार्डची जोडणी केली आहे.
शंका करा दूर
तुम्हाला पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले आहे की नाही, याविषयी शंका असेल, तर घरबसल्या तुम्हाला सोप्या पद्धतीने स्टेट्स चेक करता येईल. त्यासाठी दोन पद्धती आहेत. त्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे लागेल.