नवी दिल्ली : आजपासून या जून महिन्यात (June) हे बदल दिसून येतील. या बदलांचा तुमच्या जीवनावर परिणाम होईल. खिशावर ताण येईल. 1 जूनपासून लागू होणाऱ्या या बदलांचा (Rule change from June) महिन्याच्या बजेटवर परिणाम दिसून येईल. सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसू शकते. गॅस कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक गॅसच्या किंमती पुन्हा एकदा कपात करुन मोठा दिलासा दिला. तर स्वस्त इलेक्ट्रिक बाईकचे स्वप्न आजपासून महागले आहे. 2000 रुपयांच्या नोटा बदलविण्यासाठी जाणार असाल तर जून महिन्यात या दिवशी तुम्हाला बँकेत नोटा बदलता येणार नाही. हे मोठे बदल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
एलपीजी सिलेंडर स्वस्त
सरकारी तेल गॅस कंपन्या महिन्याच्या प्रत्येक पहिल्या तारखेला गॅसच्या किंमतीत मोठा बदल करतात. या महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किंमती बदलतात. आजपासून व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाले. त्यामुळे हॉटेलिंग, खवय्यांना पर्वणी आली आहे. बाहेरचे जेवण स्वस्त होण्याची शक्यता आहे. 19 किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत. 1 मे रोजी व्यावसायिक सिलेंडर 172 रुपयांनी स्वस्त झाले होते. जून महिन्यात गॅस कंपन्यांनी 83-85 रुपयांची कपात केली आहे. पण घरगुती ग्राहकांना, 14 किलो सिलेंडरच्या किंमतीत कोणताच दिलासा देण्यात आला नाही. किचन बजेटमध्ये गॅस सिलेंडरसाठी जादा आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.
इलेक्ट्रिक टू-व्हिलर महागली
1 जूनपासून इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी महागणार आहे. गुरुवारपासून इलेक्ट्रिक बाईक अथवा स्कूटर खरेदी करणे महागात पडेल. या ईव्हीच्या किंमती वाढणार आहेत. ग्राहकांना त्यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने FAME-II सबसिडी रक्कमेत बदल केला आहे. त्यात कपात केली आहे. 10,000 रुपये प्रति kWh केलं आहे. पूर्वी ही रक्कम 15000 रुपये प्रति kWh होती. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल्सची किंमत 25,000 ते 35,000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. 21 मे रोजी याविषयीची अधिसूचना जारी करण्यात आली होती.
बेनामी संपत्तीची लागेल लॉटरी
बँकांमध्ये पडून असलेली बेनामी संपत्ती आता वितरीत होईल. आजोबा-पणजोबा,आजीने ठेवलेली रक्कम त्यांच्या वारसदारांना मिळेल. त्यासाठी बँका तुम्हाला शोधत येतील. तुम्हाला पण बँकांकडे जाता येईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वच बँकांना ‘100 दिवसांत 100 दावे’ हे अभियान सुरु करण्यास सांगितले आहे. त्यामुळे येत्या 100 दिवसांत प्रत्येक जिल्ह्यातील किमान 100 खात्यांच्या वारसदारांचा शोध घेण्यात येत आहे. खात्यातील रक्कम व्याजासहित वारसदारांना देण्यात येईल. ही रक्कम खातेदारांच्या वारसांना परत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ग्राहकांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे संपत्ती आहे की नाही, याची माहिती संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर मिळेल.
सुट्यांची गर्दी
2000 रुपयांच्या नोटा बदलविण्यासाठी जाणार असाल तर जून महिन्यात या दिवशी बँकांमध्ये जाऊ नका. या महिन्यांत सुट्यांची गर्दी आहे. 12 दिवस बँका बंद असतील. या दिवशी बँकांना ताळे लागलेले राहिल. आरबीआयच्या संकेतस्थळानुसार, रविवार आणि शनिवार मिळून जून महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. देशात वेगवेगळ्या प्रांतातील प्रथा, सण, उत्सव याप्रमाणे बँकांना सुट्टी असते. जून महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहतील.
औषधी कंपन्यांशी संबंधीत नियम
भारताच्या औषधी महानियंत्रकांनी (DCGI) कफ सिरप (Cough Syrup) चे सॅम्पल घेऊन तपासाचे निर्देश दिले आहेत. 1 जूनपासून निर्यातीपूर्वी सिरपची चाचणी करणे आवश्यक आहे. सरकारी प्रयोगशाळांमध्ये खोकल्यावरील औषधांची चाचणी होईल. त्यासंबंधीचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल. नंतरच या औषधांची विक्री करता येईल.