नवी दिल्ली : देशात गोरगरिबांसाठी, दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकार मोफत धान्य वाटप योजना राबवत आहे. राशन कार्डच्या (Ration Card) मदतीने कोट्यवधी गरीब कुटुंबांना स्वस्त दरात राशन मिळत आहे. या फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकार (Central Government) राशन कार्डधारकांना दोन वेळा धान्य देणार आहे. होळी 8 मार्च रोजी आहे. त्यापूर्वी लाभार्थ्यांना दुसरे राशन मिळणार आहे. परंतु, अनेक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदारच (Dealer) लाभार्थ्यांच्या रेशनवर डल्ला मारतो. राशन देताना काटा मारतो. धान्य कमी मोजतो. काही लाभार्थ्यांची तर धान्यच संपल्याची थाप मारुन बोळवण केल्या जाते. अथवा त्याला कमी धान्य देण्यात येते. जर तुम्हाला स्वस्त धान्य दुकानदार त्रास देत असेल तर आता त्याकडे दुर्लक्ष करु नका, त्याची थेट तक्रार करा. अशा स्वस्तधान्य दुकानदारांना वठणीवर आणण्यासाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांक उपलब्ध केले आहेत.
केंद्र सरकारने प्रत्येक राज्यासाठी टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन क्रमांक (Helpline Number) जाहीर केला आहे. जर तुम्हाला कमी राशन मिळत असेल तर या क्रमांकावर तुम्हाला तक्रार दाखल करता येईल. केंद्र सरकारच्या वतीने देशभरातील 80 कोटी गरजू लोकांना मोफत अन्नधान्याचं वाटप करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील जनतेला 1800 22 4950 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करता येईल.
लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदाराची तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने संकेतस्थळही उपलब्ध करुन दिले आहे. https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या पोर्टलवरही करात येईल. तसेच या संकेतस्थळावर प्रत्येक राज्यासाठी दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल. अनेकदा रेशन कार्डसाठी अर्ज करुनही लाभार्थ्यांना लवकर रेशन कार्ड मिळत नाही. त्यांना अनेक महिने वाट पहावी लागते. याप्रकाराविरोधातही तक्रार करण्यात येणार आहे.
राशन कार्ड तयार करण्यासाठी सर्वात अगोदर लाभार्थ्याला संबंधित राज्याच्या अन्नधान्य पुरवठा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यासाठी आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, आरोग्य कार्ड, पासपोर्ट साईज फोटो जोडावा लागेल. राशन कार्ड मिळविण्यासाठी तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला शुल्कही जमा करावे लागेल. हे शुल्क 5 ते 45 रुपये असेल. अर्ज दाखल केल्यानंतर स्थानिक पातळीवर सत्यापन करण्यात येते. अधिकारी तुमच्या अर्जाची छाननी करुन पुढील कार्यवाही करतात.
केंद्रीय कृषी मंत्र्यांनी गेल्यावर्षी दावा केला होता. त्यानुसार, एक देश, एक राशन कार्ड या महत्वकांक्षी योजनेतंर्गत गरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. ही योजना देशातील 36 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात सुरु करण्यात आली आहे. यामध्ये देशातील 80 कोटी लाभार्थ्यांचा समावेश आहे.