नवी दिल्ली : कोरोनानंतर विमा क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आले आहे. आयुष्यात एकही विमा न काढलेल्या व्यक्तींनी पटापट आरोग्य विमा, जीवन विमा काढला. विमा काढण्याकडे (Insurance Policy) लोकांचा कल वाढला आहे. विमा क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी विविध प्रयोग सुरु आहे. सर्व प्रणाली ऑनलाईन करण्यावर भर देण्यात येत आहे. तरीही विमा क्षेत्रात अजून मोठे प्रयोग होणे बाकी आहे. आता एक मोठा बदल विमा क्षेत्रात होऊ घातला आहे. एकाच बाणात अनेक निशाणे साधता येणार आहे. हे बदल ग्राहकांच्या पथ्यावर पडणार आहेत. त्यात ग्राहकांचा मोठा फायदा होईल.
ऑल इन वन
सध्या विमा कंपन्या आरोग्य, जीवन, मालमत्ता आणि अपघात या प्रकारात ग्राहकांना विमा संरक्षण मिळते. त्यासाठी वेगवेगळ्या विमा पॉलिसी काढाव्या लागतात. त्यातही त्यात विविध कंपन्यांच्या असतात. या पॉलिसी नुतनीकरणाला येतात, तेव्हा ग्राहकांची तारंबळ उडते. पण आता ग्राहकांना ऑल इन वन विमा (All In One Insurance Policy) मिळणार आहे. त्यासाठी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) त्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
काय मिळेल लाभ
या ऑल इन वन विम्यामध्ये आरोग्य, जीवन आणि मालमत्ता यांच्या विम्याचे संरक्षण मिळेल. म्हणजे एकाच पॉलिसीमध्ये तुम्हाला आरोग्य विमा, जीवन विमा, अपघात विमा आणि मालमत्तेसंबंधीचा विमा यांचा लाभ घेता येईल. त्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसी घेण्याची गरज पडणार नाही. तसेच यामुळे विम्याचा प्रीमिअम पण कमी होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले पांडा
IRDAIचे प्रमुख देवाशिष पांडा यांनी सांगितले की, हे काम अवघड असले तरी कठिण मात्र नाही. या ऑल इन वन विमा पॉलिसीसाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच अशा प्रकारची विमा पॉलिसी लोकांना उपलब्ध असेल. तसेच यामुळे दाव्याचा निपटारा पण जलदरित्या होईल. त्यामुळे एक स्वस्त सिंगल पॉलिसी खरेदी करणे सोपे होईल. लोकांना नाहक जादा पैसा भरावा लागणार नाही. तसेच प्रत्येक पॉलिसीचा लाभ ही मिळेल.
ग्राहकांचा त्रास वाचणार
ग्राहकांना आरोग्य, जीवन, अपघात आणि इतर अनेक गोष्टींसाठी विमा खरेदी करावा लागतो. पण त्यासाठी विविध पॉलिसी शोधाव्या लागतात. त्यामुळे एकाच पॉलिसीत सर्व सेवा मिळाल्यास त्यांना विविध ठिकाणी त्याची चौकशी करण्याची गरज पडणार नाही. त्यांचा मोठा त्रास वाचेल. कंपन्यांना एकाच ग्राहकाच्या चार चार पॉलिसीची माहिती ठेवण्याची गरज भासणार नाही. तसेच एकाच प्रीमियममध्ये सर्व पॉलिसीचा फायदा होईल.