नवी दिल्ली : चाकरमानी रात्रं-दिवस कष्ट करतो. या महागाईच्या काळात नोकरी करुन कुटुंबाची जबाबदारी पार पाडतो. त्याच्या कमाईतील काही हिस्सा पीएफ खात्यात जमा होतो. आयुष्याच्या संध्याकाळी सुखी आयुष्य जगण्याची तेवढीच एक उमेद आहे. सर्वसामान्य नोकरदारांचा आजही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेवर (EPFO) मोठा विश्वास आहे. ही सरकारी संस्था असल्याने येथे पैसा सुरक्षित राहतो आणि व्याजाच्या माध्यमातून त्यातून मोठी कमाई होते, हे गृहितक पक्क बसलेलं आहे. पण PF मधील गुंतवणूक धोक्यात आली, असं सर्वच कर्मचाऱ्यांना का वाटतं आहे, केंद्र सरकारच्या या निर्णयावरुन सध्या वादंग का माजले आहे. तुमचा पैसा सुरक्षित आहे ना…
असा येतो पैसा
ईपीएफओकडे देशातील जवळपास 6 कोटी कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते आहेत. त्यात दरमहा पैसा जमा होतो. ईपीएफओ वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करते. त्यातून या संस्थेला मोठा फायदा होतो. हा फायदा व्याजाच्या रुपात ईपीएफओ वाटून टाकते. ईपीएफओ गुंतवणुकीतील मोठी रक्कम शेअर बाजारात पण गुंतविते. पण शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमयुक्त आहे. तरीही ईपीएफओ शेअर बाजारातील त्यांची गुंतवणूक वाढविण्याच्या तयारीत आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक वाढविणार
ईपीएफओ स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक वाढविण्याचा विचार करत आहे. तसेच एक्सचेंज ट्रेडेड फंड्सच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला पैसा इक्विटी आणि इतर पर्यायांमध्ये पुन्हा गुंतविण्याचा विचार करण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईपीएफओ या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अर्थमंत्रालयाकडे परवानगी मागणार आहे.
15 टक्क्यांची मर्यादा
ईपीएफओच्या नियोजन करणाऱ्या केंद्रीय मंडळाने मार्च अखेरीस याविषयीचा निर्णय घेतला आहे. मार्च मधील महत्वाच्या बैठकीत याविषयीवर चर्चा झाली. ईपीएफओ ईटीएफसाठीचा पैसा आता इक्विटी आणि इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे. असे केल्यास ईपीएफओ शेअर बाजारात थेट गुंतवणूक करु शकेल. गुंतवणुकीची मर्यादा 15 टक्क्यांवर पोहचेल.
तुमच्या गुंतवणुकीवर जोखीम?
ईपीएफओ नुसार, जानेवारी 2023 मधील आकड्यानुसार एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंडने 10 टक्केच हिस्सा इक्विटी फंडात गुंतविला होता. या संस्थेला 15 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. ईपीएफओने ईटीएफमाध्यमातून इक्विटीत गुंतवणुकीला 2015-16 मध्ये सुरुवात केली होती. 31 मार्च 2022 मधील आकड्यांनुसार, ईपीएफओने ईटीएफमध्ये 1,01,712.44 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. एकूण 11,00,953.55 कोटी गुंतवणुकीत हे प्रमाण 9.24 टक्के आहे. शेअर बाजार हा जोखीमयुक्त आहे. ईपीएफओला केंद्र सरकारने शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी परवानगी दिली तर त्याचा फटका या गुंतवणुकीला बसू शकतो, हे तर कर्मचाऱ्यांना चांगलेच कळते.