आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे की, कुत्रा (Dog) हा जगातील सगळ्यात विश्वासू प्राणी. मात्र कुत्र्याने मालकाला किंवा अन्य कुणाला चावा (Bite) घेतल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. काही दिवसांआधी गाझियाबादमध्ये अशीच एक घटना घडली होती जिथे एका पिटबुल जातीच्या कुत्र्याने 11 वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केला. यामध्ये बालक गंभीर जखमी झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर 150 टाके पडले. तसेच लखनौमध्ये पिटबूलच्या हल्ल्यामध्ये एका वृद्ध महिलेचा जीव देखील गेला होता. आपण पिटबुलसह जगातील 5 धोकादायक कुत्र्यांबद्दल (5 most dangerous dogs) जाणून घेणार आहोत. अनेक देशांनी या कुत्र्यांना पाळण्यावरही बंदी घातली आहे.
पिट बुल हा जगातील सर्वात धोकादायक कुत्रा मानला जातो. पिट बुल जातीचे कुत्रे आक्रमक आणि अतिशय धोकादायक असतात. या जातीच्या कुत्र्यांनी मालकालाही चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. जगभरातील अनेक देशांनी या जातीच्या कुत्र्यांच्या जन्मावर देखील बंदी आहे. मात्र, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये आजही पिट बुल पाळले जातात. त्यामध्ये भारतही एक देश आहे.
रॉटवेलर जातीचे कुत्रे सर्वात शक्तिशाली मानले जातात. तसेच, आक्रमक झाल्यावर ते कुणालाही चावा घेण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. या जातीच्या कुत्र्यांना विशेष प्रशिक्षणाची गरज असते. अनेक देशांमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही जात चपळाईसाठी ओळखली जाते. त्यांचा स्वभाव पटकन आक्रमक होतो. त्यांचे वजन 35 ते 48 किलो असते. भारतातही अनेक घरांमध्ये हे पाळले जातात.
बर्फाळ प्रदेशात सुरक्षेसाठी काही देश सायबेरियन हस्की जातीच्या कुत्र्यांचा करतात. या कुत्र्यांमध्ये कोल्ह्याचे गुण आढळतात. त्यामुळे या प्रजातीचे कुत्रे फारसे माणसाळत नाही. परंतु, जर त्यांना प्रशिक्षित केले गेले तर ही जात देखील मैत्रीपूर्ण बनते आणि शांत राहते. यासाठी अनुभवी प्रशिक्षकांकडून योग्य प्रशिक्षणाची गरज असते. या कुत्रांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक असते, त्यामुळे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ते आक्रमक होतात.
लांडगे आणि कुत्र्यांच्या प्रजननातून वुल्फ हायब्रीड कुत्र्यांच्या अनेक जाती निर्माण झाल्या आहेत. या कारणास्तव त्यांना वुल्फ हायब्रिड प्रजाती म्हणतात. या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये या जातीच्या कुत्र्यांच्या पैदाशीवर बंदी घालण्यात आली आहे.
डॉबरमॅन पिंचर्स जातीचे कुत्रे सुरक्षिततेसाठी ठेवण्यात येतात. म्हणूनच तुम्ही त्यांना बहुतेक पोलीस आणि सैन्यासोबत पाहिले असेल. कधीकधी त्यांचा चेहरा इतका आक्रमक असतो की, पाहूनच धडकी भरते. शिकारी जातीचा हा कुत्रा गुह्याच्या शोधात मदत करतो. सध्या त्याला सामान्य लोकंही आवड म्हणून पाळताना दिसत आहेत. या जातीचे कुत्रे अनोळखी माणसांना पाहून आक्रमक होतात, प्रसंगी हल्ला देखील करतात. त्यांचे वजन 34 ते 45 किलो असते. अनेक देशांमध्ये त्याचे पालन करण्यास बंदी आहे.