नवी दिल्ली : गुरुवारपासून जून महिना (June Month) सुरु होत आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार होत असल्याने जमाना खूश होत असला तरी दुसरे पण अनेक बदल होतात. या बदलामुळे घराचे बजेट पण कोलमडू शकते. गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक महागाईच्या झळांनी बेजार झाले आहेत. त्यातच गॅस सिलेंडरच्या किंमती, सीएनजी, पीएनजीच्या किंमतीत (CNG, PNG Price) बदल झाला तर किचनचे बजेट कोलमडू शकते. 1 जून रोजी या बदलाची कर्मकथा समोर येईल. त्याचा खिशावरील ताण पण दिसेल तसेच किती फरक पडला हे पण समजेल.
ईव्ही दुचाकी महागणार
1 जूनपासून इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी महागणार आहे. गुरुवारपासून इलेक्ट्रिक बाईक अथवा स्कूटर खरेदी करणे महागात पडेल. या ईव्हीच्या किंमती वाढणार आहेत. ग्राहकांना त्यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने FAME-II सबसिडी रक्कमेत बदल केला आहे. त्यात कपात केली आहे. 10,000 रुपये प्रति kWh केलं आहे. पूर्वी ही रक्कम 15000 रुपये प्रति kWh होती. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल्सची किंमत 25,000 ते 35,000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. 21 मे रोजी याविषयीची अधिसूचना जारी करण्यात आली होती.
बँका येतील शोधत
वाडवडिलांनी बँकेत ठेव ठेवली असेल तर आता ही ठेव परत मिळेल. त्यासाठी बँका तुम्हाला शोधत येतील. तुम्हाला पण बँकांकडे जाता येईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वच बँकांना 100 दिवसांत 100 दावे हे अभियान सुरु करण्यास सांगितले आहे. त्यामुळे येत्या 100 दिवसांत प्रत्येक जिल्ह्यातील किमान 100 खात्यांच्या वारसदारांचा शोध घेण्यात येत आहे. खात्यातील रक्कम व्याजासहित वारसदारांना देण्यात येईल. ही रक्कम खातेदारांच्या वारसांना परत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ग्राहकांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे संपत्ती आहे की नाही, याची माहिती संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर मिळेल.
घरगुती गॅसच्या किंमती
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बदलाचे वारे वाहते. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅसच्या किंमतीत मोठा बदल होतो. सरकारी तेल कंपन्या यासंबंधीची घोषणा करतात. LPG गॅसच्या किंमती पहिल्या दिवशी निश्चित होतात. यापूर्वी घरगुती गॅस, 14 किलोच्या गॅसच्या दरात कोणताही बदल झाला नाही. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची कपात झाली होती. एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक गॅसधारकांना मोठा दिलासा मिळाला होता. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत कपात झाली होती.
CNG-PNG च्या किंमतीत बदल
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत जसा बदल होतो, तसाच बदल CNG-PNG च्या किंमतीत होतो. पेट्रोलियम कंपन्या दिल्ली आणि मुंबई शहरांसाठी CNG-PNG च्या भावात बदल करतात. एप्रिल मध्ये दिल्ली आणि मुंबईत CNG-PNG च्या किंमतीत कपात झाली होती. पण मे महिन्यात सर्वसामान्यांन कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे चाकरमान्यांचे लक्ष आता एक तारखेकडे लागले आहे. यावेळी भावात कपात होते की दरवाढ होते, हे स्पष्ट होईल.