मुंबई : एक जूनपासून आर्थिक आणि व्यवसायिक क्षेत्रामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल पहायला मिळणार आहेत. या बदलांचा परिणाम थेट तुमच्या जीवनावर आणि खिशावर पडणार आहे. एक जूनपासून बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आपल्या चेक पेमेंटच्या पद्धतीमध्ये बदल करणार आहे. यासोबतच वाहनांचा थर्ड पार्टी विमा (Third party insurance) देखील महागणार आहे. एसबीआय बँकेकडून (SBI Bank) होमलोनच्या व्याज दरात वाढ करण्यात येणार असल्याने होम लोन महाग होणार आहे. एक जूनपासून गोल्ड हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. सोबतच अॅक्सिस बँक आपल्या सेविंग्स खात्याच्या नियमांमध्ये काही बदल करणार आहे. इंडियन पोस्ट बँकेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे महाग होणार आहे. सोबतच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची देखील शक्यता आहे. आज आपण एक जूनपासून जे बदल होणार आहेत, त्यबाबत चर्चा करणार आहोत.
एक जूनपासून चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह सर्वच वाहनांचा थर्ट पार्टी विमा महागणार आहे. एक जूनपासून तुम्हाला प्रीमियमसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. दुचाकी वाहनांसाठी 150 सीसी ते 350 सीसीच्या वाहनांसाठी 1,366 रुपये प्रीमियम द्यावा लागणार आहे. तर 350 सीसीपेक्षा अधिक वाहनांसाठी 2,804 रुपये मोजावे लागणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया ‘एसबीआय’ने आपल्या होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट ‘ईबीएलआरमध्ये’ 40 बेसीस पॉइंटची वाढ केली आहे. त्यामुळे आता ईबीएलआर 7.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढलेले व्याज दर एक जूनपासून लागू होणार असल्याने गृहकर्ज महाग होणार आहे. गृहकर्ज महाग झाल्याने तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घरासाठी अधिक रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने देखील आता आर्थिक व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक एक जूनपासून नवे नियम लागू करणार आहे. नव्या नियमानुसार पहिल्या तीन आर्थिक व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र त्यानंतर पैसे जमा करणे किंवा पैसे काढणे तसेच मिनी स्टेटमेंट यासाठी प्रत्येक व्यवहारावर एक ठराविक रक्कम अधिक जीएसटी आकारण्यात येणार आहे.
गॅस पुरवठा कंपन्यांकडून दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरचे दर जाहीर केले जातात. एक जून रोजी एलपीजी गॅसचे नवे दर जारी केले जातील. वाढती महागाई पहाता गॅस सिलिंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चालू महिन्यात एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 102 रुपयांची वाढ करण्यात आली होती.