Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये (Stock) गेल्या काही व्यापारी सत्रात (Trading Session) सातत्याने तेजी दिसून येत आहे. आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात शुक्रवारच्या सत्रात या खासगी बँकेचा (Private Bank) शेअर 3 टक्क्यांनी वाढला होता. तर गेल्या आठवडाभरात त्यात 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, येस बँकेच्या शेअरची किंमत गेल्या एका महिन्यात 12.65 वरून 15 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत या शेअरने आपल्या भागधारकांना 18 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात बाजार कोसळत असताना या शेअरने तेजीची वाट धरली होती. 7 एप्रिल 2022 रोजी हा शेअर 16.25 रुपयांवर जाऊन पोहचला होता. गेल्या वर्षभराचा विचार करता हा उच्चांकी स्तर होता. बँकेच्या पत मानांकनात (Credit Rating) वाढ झाल्याने शेअरला फायदा झाला असल्याचे शेअर विश्लेषकांनी म्हटले होते. आता हा शेअर हा टप्पा ओलांडून लवकरच 19 रुपयांपर्यंत पोहचेल असा अंदाज लावण्यात येत आहे. असे जर झाले तर गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होऊ शकतो.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, निधी उभारणी आणि मजबूत तिमाही निकालानंतर येस बँकेचे शेअर्सची किंमत वाढत आहे. हा स्टॉक सध्या 12.50 ते 16.20 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे, त्यामुळे हा टप्पा तो सहज पार करेल असा तज्ज्ञांना विश्वास वाटत आहे. त्यानंतर या शेअर 19 पर्यंत अथवा त्यापुढे ही जाण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी तज्ज्ञांनी थोडं थांबण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 16.20 रुपयांच्यावर गेल्यावरच गुंतवणूकदारांनी त्यामध्ये गुंतवणुक करावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
येस बँकेचे शेअर्स का वाढत आहेत याविषयी, शेअर इंडियाचे अध्यक्ष आणि संशोधन प्रमुख रवी सिंग यांच्या मतानुसार, येस बँकेचे शेअर बाजारात चांगली कामगिरी करत आहेत. बँकेने विविध माध्यमातून निधी उभारण्याची योजना आखली आहे. बँकेचे त्रैमासिक परिणाम लक्षात घेता, नजीकच्या काळात हा शेअर 17 ते 18 रुपयापर्यंत सहज मजल मारेल आणि निर्धारीत लक्ष्य ही गाठेल.
शुक्रवारी संध्याकाळी, येस बँकेने कार्लाइल आणि अॅडव्हेंट इंटरनॅशनल फंड या दोन जागतिक खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांकडून सुमारे 1.1 अब्ज डॉलर (सुमारे 8,900 कोटी रुपये) इक्विटी भांडवल उभारण्याची घोषणा केली. बँकेच्या संचालक मंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत 369.61 कोटी इक्विटी शेअर्स आणि 256.75 कोटी वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला. 13.78 रुपये प्रति शेअर दराने शेअर्स जारी केले जातील. इक्विटी शेअर्समध्ये परिवर्तनीय प्रत्येक वॉरंटचे मूल्य 14.82 रुपये आहे. शेअर्सचे दर्शनी मूल्य दोन रुपये असू शकेल.