नवी दिल्ली : सध्याचे युग हे डिजिटलायझेशनचे (Digitalization) आहे. झपाट्याने सर्वच सेवा-सुविधांचे डिजिटलायझेशन सुरु आहे. सध्याच्या काळात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्यावर लोकांचा भर आहे. त्यात मोबाईलवर, लॅपटॉप, टॅबवर अगदी सहजरित्या सेवा मिळत असतील, तर त्या कोणाला नकोय. एका क्लिकवर सुविधा हात जोडून उभ्या असतील, त्याचा कोणीही फायदा घेणारच. लोक आता त्यांचे जास्तीत जास्त काम इंटरनेट आणि मोबाईलच्या मदतीने करत आहेत. जेवण ऑर्डर करण्यापासून ते बँकेत खाते उघडण्यापर्यंत सर्वच गोष्टी घरबसल्या होत आहे. त्याचा फायदा गुन्हेगार करत आहेत. अनेक पॅनकार्डधारकांना, सायबर गुन्हेगार जाळ्यात (PAN Card Banking Scam) ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. एका गोड मुलीच्या आवाजात त्यांना कॉल करण्यात येत आहे. त्यानंतर काय होते, हे प्रकरण नेमके काय आहे, ते वाचाच..
मुलगी करते कॉल
अनेक पॅनकार्डधारकांना याचा अनुभव आला आहे. त्यांना एका मुलीचा कॉल येतो. ही मुलगी बँकेकडून बोलत असल्याचा दावा करते. मार्च एंड असल्याने तातडीने तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे. त्यामुळे पॅनकार्ड क्रमांक सांगा, हा पॅनकार्ड क्रमांक पुन्हा अपडेट करण्यासाठी एक ओटीपी येईल, तो सांगण्याचा आग्रह करते. तुम्ही ही माहिती दिली की, तुमच्या मोबाईलवर थोड्याच वेळात धडाधड मॅसेज येतात. त्यात तुमच्या खात्यातून रक्कम काढल्याचे समजते.
पॅनकार्ड हे आर्थिक व्यवहारासाठी महत्वाचे कागदपत्र आहे. बँकेत, शेअर बाजारात, पोस्ट ऑफिसमध्ये, म्युच्युअल फंड हाऊसेस खाते उघडण्यासाठी पॅनकार्डचा आग्रह धरतात. प्राप्तिकर खाते हे कार्ड देते. सध्या पॅनकार्डधाराकांना असे खोटे कॉल करुन फसविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तुम्ही जर तुमच्या पॅनकार्डची आणि ओटीपीची माहिती दिली की, तुम्ही फसलात म्हणून समजा.
कर्जाच्या नावाखाली फसवणूक
परस्पर कर्ज घेऊन फसवणूक केल्या जाते. त्यासाठी व्यक्तीचे पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, व्याज पुरवठा करणाऱ्या ॲपचा वापर करण्यात येतो. तात्काळ कर्ज देणाऱ्या ॲपमुळे कमी कर्जासाठी कुठलाही पडताळा करण्यात येत नाही. त्यामुळे सायबर भामटे तुमच्या नावावर अनेक छोट्या प्रकारचे कर्ज घेऊन फरार होतात.
असे राहा सावध
सर्वच बँका, त्यांच्या खातेदारांना अशा बोगस, खोट्या कॉलपासून सावध राहण्याचा इशारा देतात, सल्ला देतात. कोणतीही बँक, त्यांचे प्रतिनिधी तुमच्याकडे फोनवरुन ओटीपी मागत नाहीत. जर अशा प्रकारचा कॉल आला, एसएमएस आला तर त्याला असली कोणतीही माहिती देऊ नका. त्यानंतर बँकेला याविषयीची तक्रार करा. सायबर शाखेशी संपर्क साधून याप्रकाराची माहिती द्या.