मुंबई : भारतीय लोकांचे सुवर्णप्रेम जगजाहीर आहे. चीननंतर जगात सर्वात मोठा सोन्याचा आयातदार (Gold Importer) आहे. कितीही संकटे आली तरी भारतीय लोकांचे सोन्यावरील प्रेम किंचितही कमी झाले नाही. कोरोनाच्या काळात जगासोबत भारतही बेजार झाला होता. पण या ही काळात देशात सोन्याची आयात कमी झाली नाही, उलट ती वाढली आणि सोन्याचे दर ही गगनाला भिडले. हा पिवळाधम्मक धातू जेवढा आकर्षक आहे, तेवढीच त्यातील गुंतवणूक (Investment) ही फायद्याची आहे. जमिनीतील गुंतवणुकीच्या खालोखाल भारतीय लोक सोन्यात गुंतवणूक करण्यात अग्रेसर आहेत. चलनवाढ किंवा अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता वाढली की गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे आकर्षित होतात. परिणामी प्रत्येक दिवशी सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसतो. जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये (Portfolio) अजून सोन्याचा समावेश केला नसेल तर सोन्यामध्ये गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते जाणून घ्या.
ईटी मनीचे सीओओ संतोष नवलानी सांगतात की, इतिहास पाहिला तर गेल्या 12-15 वर्षांत सोन्याने कितीही जागतिक संकटे आली तरी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 2008 साली मंदी आल्यानंतर सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून आली. सोने वधारले. त्यानंतर त्यामध्ये विशेष अशी मोठी वाढ झाली नाही. 2019 मध्ये अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे सोन्याच्या किंमती पुन्हा उसळल्या.2020 मध्ये कोरोना काळात सोन्याने सुमारे 30 टक्के परतावा दिला. 2021 मध्ये चांगला परतावा मिळवून देण्यात सोने अपयशी ठरले . आता 2022 मध्ये युक्रेनच्या संकटामुळे सोन्यात पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे.
सोन्यात गुंतवणूक करताना त्याचा अर्थ दागिने असा होत नाही. जर तुम्ही दागिने खरेदी केले असतील तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किमान 5-10% सोनं असणे गरजेचे आहे, अशी शिफारस आर्थिक तज्ज्ञ करतात. डिजिटल गोल्ड, सॉवरेन गोल्ड आणि गोल्ड ईटीएफमध्ये ही गुंतवणूक करता येईल.
डिजिटल गोल्ड तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता. जशी खरेदी करु शकता तसेच ऑनलाईन पद्धतीनेच त्याची विक्री करता येते. डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूकदार 24 कॅरेट शुद्ध सोन्याची खरेदी करतो. हे सोने सुरक्षित ठेवण्यात येते आणि त्याला विम्याचे संरक्षणही असते. डिजिटल सोन्यातील गुंतवणूकही 1 रुपयापासून सुरू करता येईल. डिजिटल सोने खरेदी केल्यावर, खरेदीदाराला वैयक्तिक सुरक्षा वॉलेट मिळते ज्याचा विमा देखील काढता येतो. विशेष बाब म्हणजे बाजारभावानुसार या डिजिटल सोन्याचे रोखीत अथवा ख-या सोन्यात कधीही परतावा मिळविता येतो.
तुम्हाला जर कागदी सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे गोल्ड ईटीएफ हा होय. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ऑनलाइन स्टॉक ब्रोकरची गरज आहे. शेअरप्रमाणे हे सोने खरेदी करता येते. त्याची खरेदी एक्सचेंजच्या मदतीने केली जाते. गोल्ड ईटीएफचा दिवसभर व्यापार होतो. ज्यामुळे किंमतीत चढ-उतार होतात. एक्सचेंजच्या मदतीने गोल्ड ईटीएफची खरेदी-विक्री सहज करता येते. एक गोल्ड ईटीएफ म्हणजे 1 ग्रॅम सोनं असते. यामध्ये इलेक्ट्रॉनिक गोल्ड तुमच्या डिमॅट अकाऊंटमध्ये जमा केलं जातं. याचे वैशिष्ट्य म्हणजे सोन्याच्या किंमतीबाबत शेअर बाजारात पूर्ण पारदर्शकता आहे. याशिवाय गोल्ड ईटीएफवर वेल्थ टॅक्सही लागत नाही. गुंतवणुकीची सुरुवात 1 ग्रॅम सोने किंवा एक युनिटनेही करता येते.
खासगी क्षेत्रातील बँका बचत खात्यावर 6 टक्क्यांपेक्षा अधिकचे व्याज देतात; जाणून घ्या कुठे होईल फायदा
सुवर्ण नियंत्रण कायदा इतिहासजमा; तरीही घरात सोने ठेवण्यावर काय आहेत मर्यादा?
Diesel Price | रिटेल स्थिर, होलसेल महाग; डिझेल खरेदीसाठी का लागल्या रांगा? जाणून घ्या एका क्लिकवर!