Aadhaar Card News | आधार कार्ड हे आता श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंतच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनले आहे. आजच्या काळातील ते अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रं आहे. याच्या मदतीने एखादी व्यक्ती सरकारी सेवांचा सहज लाभ घेऊ शकते. पण गेल्या काही काळापासून सरकारकडे डुप्लिकेट आधार कार्डशी संबंधित अनेक तक्रारी येत होत्या. यावर कारवाई करत आधार कार्ड जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (Unique Identification Authority of India-UIDAI) कठोर पाऊल उचलत देशभरातील तब्बल 5 लाख 98 हजार 999 आधार कार्ड रद्द केले आहेत. जानेवारी 2022 पासून सरकारने 11 संकेतस्थळांना आधार कार्ड सेवा देण्यास बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती नुकतीच दिली. कोणत्याही नागरिकाला आधार कार्डची नोंदणी करण्याचा, कोणाचाही बायोमेट्रिक बदल करण्याचा आणि मोबाइल क्रमांक बदलण्याचा अधिकार आता सरकारकडे आहे, या संकेतस्थळांकडे (Unauthorized Website) नाहीत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना बोगस आधार कार्डविषयी माहिती दिली. डुप्लिकेट आधार कार्डची समस्या दूर करण्यासाठी यूआयडीएआय (UIDAI) सातत्याने पावले उचलत आहे. यासह आता आधार कार्डमध्ये ‘फेस’ व्हेरिफिकेशनचे फीचर अॅड करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. म्हणजेच आता आधार कार्ड पडताळणीत चेहऱ्याचाही वापर केला जाणार आहे. आतापर्यंत पडताळणीसाठी फक्त बोटांचे ठसे आणि डोळ्यांचा वापर केला जात होता. पण या नव्या फिचरमुळे बोगस आधार कार्ड हुडकून काढण्यासाठी आणि ते रोखण्यासाठी मदत होणार असल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले.
आधार कार्ड लिंक्ड सेवांचा दावा करणाऱ्या बनावट वेबसाइटला प्राधिकरणाने नोटीस बजावली असून अशा बोगस संकेतस्थळावर लवकरच कारवाई अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच त्यांना आधार कार्डसंबंधित सेवा पुरवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. एवढेच नाही तर सरकारच्या तीव्र आक्षेपानंतर या वेबसाइट्सच्या होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हायडरना त्या तातडीने ब्लॉक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जानेवारी 2022 पासून सरकारने 11 वेबसाईटना आधार कार्ड सेवा देण्यास बंदी घातली आहे. कोणत्याही नागरिकाला आधार कार्डची नोंदणी करण्याचा, कोणाचाही बायोमेट्रिक बदल करण्याचा आणि मोबाइल क्रमांक बदलण्याचा अधिकार या वेबसाइटना नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
नागरिकांना त्यांच्या आधार कार्डमध्ये आपला पत्ता, मोबाईल नंबर किंवा फोटो बदलायचा असेल तर त्यांना आधार कार्ड सेंटर किंवा प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जावे लागणार आहे. एवढेच नाही तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत असल्याचा संशय असल्यास त्यांनीही सेवा केंद्राशी संपर्क साधून त्याची माहिती घ्यावी अथवा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाशी संपर्क साधावा.