नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना गिफ्ट दिले आहे. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष घोषणा केली आहे. त्यांनी बजेट सादर करताना, ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेत (SCSS) रक्कम जमा करण्याची मर्यादा दुप्पट केली आहे. त्यामुळे आता या योजनेत जवळपास 30 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येईल. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जास्त बचतीवर लाभ मिळेल. तर मासिक बचत योजनेत 9 लाख रुपयांपर्यंतची बचत करता येईल. वृद्धपकाळासाठी ज्येष्ठ नागरिकांना मोटी गुंतवणूक करता येईल. त्याचा त्यांना फायदा होईल.
अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेत कमाल गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्यात आली आहे. आता ही मर्यादा 15 लाख रुपयांहून 30 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक वाढविता येईल.
मासिक उत्पन्न योजनेची कमाल गुंतवणूक मर्यादा 4.5 लाख रुपयांहून 9 लाख रुपये करण्यात आली आहे. ही सवलत वैयक्तिक खातेदारांसाठी आहे. तर संयुक्त खातेदारांसाठी या योजनेत गुंतवणूक मर्यादा आणखी वाढविण्यात आली आहे. 9 लाख रुपयांहून ही मर्यादा 15 लाख रुपये करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक योजना ही सरकारी बचत योजना आहे. या योजनेत रक्कम बुडण्याची शक्यता नाही. कोणताही धोका नाही की जोखीम नाही. या योजनेवर सध्या 8 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेतंर्गत 60 वर्षांवरील कोणताही ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करु शकतो.
ही योजना एक अल्प कालावधीची गुंतवणूक योजना आहे. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. मॅच्युरिटीनंतर एका वर्षात गुंतवणूकदार मॅच्युरिटीचा कालावधी वाढवू शकतो. पुढील तीन वर्षांसाठी हा कालावधी वाढविता येतो. SCSS योजनेत केवळ एक हजार रुपयांपासुन गुंतवणूक करता येते.
या योजनेत मॅच्युरिटीनंतर रक्कम काढल्यास त्यावर कर लागत नाही. पूर्वीपेक्षा गुंतवणूक वाढविल्याने, त्यावर व्याजाचा फायदा मिळेल. उतारवयात ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीची चिंता करावी लागत नाही. त्यावर हमखास परतावा मिळतो. त्यांची रक्कम बुडण्याची कोणतीही शक्यता नाही. उलट त्यांना चांगला परतावा मिळेल.
वरिष्ठ पेन्शन विमा योजना अर्थ मंत्रालयाने सुरू केलेली आहे. ही पेन्शन योजना 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. भारतीय जीवन विमा निगमद्वारे ही योजना राबविण्यात येते. एलआयसी या योजनेचे नियंत्रण करते. या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही.
योजनेतंर्गत 10 वर्षांसाठी वार्षिक 8 टक्के व्याज दरासह खात्रीशीर पेन्शन मिळते. तुम्ही मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक पेन्शनची निवड करू शकता. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला पेन्शनचा पर्याय निवडता येतो.