मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून वाढणाऱ्या थंडीमुळे महाराष्ट्र गारठला (Cold Wave) आहे. विविध जिल्ह्यांतील तापमान आज आणखी काही अंशांनी घसरलं. दिल्लीसह उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) थंडगार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात मुंबई (Mumbai), पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात कडाक्याची थंडी पडली आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भात भंडारा जिल्हा आणि परिसरात रात्री अचानक वातावरण बदलल्याने अवकाळी पाऊसाचा फटका बसला.
दिल्लीत आज थंडीने कहर केलाय. किमान तापमान ४ अंश सेल्सियस तर कमाल तपामान १८ अंश सेल्सियस आहे. पुढील तीन दिवस दिल्लीला अशा थंडीचा सामना करावा लागणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. उत्तर प्रदेशातही तापमान ७ अंशांपर्यंत घसरले आहे. तर थंडगार वाऱ्याचाही सामना येथील नागरिकांना करावा लागतोय.
मुंबई- 20 अंश सेल्सियस, जळगाव- 22 अंश सेल्सियस, औरंगाबाद 11.31अंश सेल्सियस, महाबळेश्वर 15.81अंश सेल्सियस, नाशिक 14अंश सेल्सियस
, मालेगाव 16.41 अंश सेल्सियस, अकोला 18.5 अंश सेल्सियस, बुलढाणा 7.11 अंश सेल्सियस, रत्नागिरी 21.6अंश सेल्सियस, कोल्हापूर 28.8अंश सेल्सियस, सांगली 28अंश सेल्सियस अशी तापमानाची नोंद झाली.
अवकाळी पावसाने भंडारा जिल्ह्यात हुडहुडी भरली. जिल्ह्यात 12 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन पहाटेच्या सुमारास अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला. 20.27 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाने थंडीचा कडाका वाढला असून, दिवसभर हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे. अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना बसणार असून, ढगाळ वातावरणाने किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
Cold wave grips Delhi, people sit around bonfires to get relief. Visuals from Mandi House pic.twitter.com/cR1YgkyNBy
— ANI (@ANI) January 4, 2023
नंदूरबार जिल्ह्यातील सपाटी भागात ११ अंश सेल्सियस पेक्षा कमी आहे, तर सातपुड्याच्या दुर्गम भागात ९ अंश सेल्सिअस तापमान आहे. तापमानात घट होत असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना याच्या फायदा होणार आहे. मात्र तापमानाच्या पारा आणखीन घसरल्याने रब्बी हंगामातील पिकांवर बुरशीजन्य रोग येण्याच्या अंदाज देखील कृषी विज्ञान केंद्र कडून वर्तवण्यात आले आहे.
इगतपुरी शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. हवेत गोठवनारा गारवा पसरला आहे. थंडीबरोबरच हवेचा जोरही वाढला असल्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. इगतपुरीचे तापमान 16 डिग्री सेल्सिअस झाले आहे. सकाळी आकाशात आभूट पसरले असून सकाळच्या वेळी सूर्यही अगदी लहान गोळ्यासारखा दिसत आहे. नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरी कपडे परिधान केले.