नवी दिल्ली : आता प्रत्येक ठिकाणी ओळखपत्राच्या स्वरुपात (ID Proof) आधार कार्डचा (Aadhar Card) वापर करण्यात येतो. तुम्हाला नवीन खाते उघडायचे असेल अथवा नवीन सिमकार्ड असो वा भाड्याने घर घ्यायचे असो, तुम्हाला आधार कार्डची गरज पडते. अशावेळी तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमचे महत्वाचे काम अडकू शकते. पॅनकार्ड (Pan Card) हे तुमची आर्थिक कुंडली मांडते. पॅनकार्ड तुमचा आर्थिक दस्ताऐवज आहे. या दोन्ही कार्डच्या जोडणीसाठी सातत्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. यावेळी 31 मार्च 2023 ही अंतिम मुदत होती. ती वाढविण्यात आली आहे. पण 1000 रुपयांच्या दंडातून नागरिकांची सूटका नाही. त्यामुळे ही रक्कम न जमा केल्यास तुम्हाला सवलत मिळेल की शिक्षा..
मुदतवाढ
यापूर्वी पॅनकार्ड आधार कार्ड जोडणीची अंतिम मुदत 31 मार्च 2023 होती. त्यानंतर ही तारीख वाढविण्यात आली. आता ही मुदतवाढ 30 जून पर्यंत आहे. तुम्ही अजूनही जोडणी केली नसेल तर लवकरात लवकर ही जोडणी करुन घ्या. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. घरबसल्या तुम्हाला ही प्रक्रिया करता येईल.
पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक अर्थात ही मुदतवाढ देताना केंद्र सरकारने नागरिकांना दंडाच्या रक्कमेतून कुठलीही सवलत मात्र दिली नाही. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांनी दंडाची रक्कम जास्त असल्याने जोडणीकडे पाठ फिरवल्याचा दावा करण्यात येत होता. तसेच ही दंडाची रक्कम माफ करण्याची विनंती करण्यात येत होती. पण 1000 रुपये भरल्याशिवाय या दोन्ही कार्डची जोडणी होणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.
तर मोठा दंड
30 जूनपर्यंत दोन्ही कार्डची जोडणी न झाल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यानंतर जोडणी केल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड बसू शकतो. आयकर अधिनियमाच्या कलम 272बी अंतर्गत 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक हजार रुपयांचा दंड भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यामुळे ज्यांना हे दोन्ही कार्ड जोडायचे आहे, त्यांना सध्याची रक्कम भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
नियम काय सांगतो
आयकर अधिनियमचे कलम 139 एए नुसार, प्रत्येक वापरकर्त्याला, ज्याने 1 जुलै, 2017 रोजी पर्यंत पॅनकार्ड जारी करण्यात आले आहे आणि त्यांच्याकडे आधार कार्ड आहे. त्यांनी आधार कार्ड-पॅन कार्ड लिकिंग करणे आवश्यक आहे. या नियमातून आसाम, जम्मू आणि काश्मीर, मेघालय या राज्यातील रहिवाशांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही. तसेच जे नागरीक 80 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यांनाही या प्रक्रियेतून सूट देण्यात आली आहे. तसेच जे भारतीय नागरीक नाहीत, त्यांना ही हे दोन्ही कार्ड लिंक करण्याची गरज नाही.
तर होईल नुकसान
डेडलाईनपर्यंत आधार-पॅनकार्ड लिकिंग नाही केले तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर त्या नागरिकाला, करदात्याला आयकर रिटर्न फाईल करताना अडचणींचा सामना करावा लागेल. तर त्याचा टॅक्स रिफंडही अडकून पडेल. तर त्याच्या दुसऱ्या आर्थिक व्यवहारांवर पण परिणाम होईल. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर बँक खाते उघडण्यास अडचण होईल. तर म्युच्युअल फंड आणि स्टॉकमधील गुंतवणूक करणे अडचणीचे ठरेल.