नवी दिल्ली : आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol & Diesel) दरात बदल झालेला नाही. गेल्या वेळी ६ एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol & Diesel Price) वाढ झाली होती. तेव्हापासून ते स्थिर आहे. मात्र, त्यानंतर घरगुती स्वयंपाकाचा गॅस आणि सीएनजी गॅसच्या दरात अनेकवेळा वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर 113 डॉलरच्या पातळीवर आहे. जागतिक स्तरावर, तेलाची सरासरी किंमत $1.33 च्या पातळीवर आहे, म्हणजे 102 रुपये प्रति लिटर. सध्या भारतात पेट्रोलची सरासरी किंमत 113 रुपये प्रति लिटर आहे. तर शनिवारी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत भडका उडाला आणि किंमतीत थेट 50 रुपयांनी वाढ झाली होती. यामुळे राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची (Domestic Cooking Gas) किंमत ही 1000 रुपयांपर्यंत गेली आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेलकडून सर्वसामान्यांना आज दिलासा मिळाला आहे.
दिल्लीत आज पेट्रोलचा दर 105.41 रुपये आणि डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 120.51 तर डिझेलचा दर 104.77 रुपये आहे. दिल्ली आणि मुंबई व्यतिरिक्त कोलकात्यात आज पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर आहे.
50 रुपयांच्या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत आता 999.5 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतही या सिलिंडरची किंमत 999.5 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकात्यात त्याची किंमत 1026 रुपये आहे आणि चेन्नईमध्ये त्याची किंमत 1015.50 रुपये झाली आहे. नोएडामध्ये 997.5 रुपय आहे. यापूर्वी मे महिन्याच्या पहिल्या दिवशी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. महानगरांमध्ये त्याची किंमत 104 रुपयांपर्यंत वाढ झाली होती. यापूर्वी मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर महाग झाला होता. तर 22 मार्च रोजी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
6 एप्रिल रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. 6 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 80-80 पैशांनी वाढल्या होत्या. तर 6 एप्रिलपासून आज 28 एप्रिलपर्यंत इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी 4 नोव्हेंबर 2021 ते 21 मार्च 2022 पर्यंत संपूर्ण देशात इंधनाचे दर पूर्णपणे स्थिर होते. त्यानंतर 22 मार्च 2022 पासून तेलाच्या किमती वाढू लागल्या. 22 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 10 रुपयांनी महागले आहे.