EPFO Contribution | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये कंपनी जर तुमचे आणि कंपनीचे योगदान (EPFO Contribution) जमा करत नसेल तर चिंता करु नका. कंपनीला तुम्हाला धडा शिकवता येतो. नियमानुसार, मालक अथवा कंपनी कर्मचाऱ्याच्या मुळ वेतनाच्या 12% रक्कम पीएफसाठी कपात करते. हे योगदान पीएफ खात्यात जमा करण्यात येते. तसेच त्याचे ही तेवढेच योगदान पीएफ खात्यात जमा करण्यात येते. मालकाने जे योगदान दिलेले आहे. त्यापैकी 8.33 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंडात (Pension Fund), तर उर्वरित रक्कम त्याच्या पीएफ खात्यात जमा करण्यात येते. दर महिन्याला हे योगदान देणे बंधनकारक आहे. जर नियोक्ता (employer) असे करत नसेल तर त्याविरोधात तक्रार करण्याचा अधिकार नोकराला आहे. कर्मचाऱ्याला त्याच्या ईपीएफओ खात्यात रक्कम जमा होते की नाही, हे ऑनलाईन तपासता येते. तसेच संघटनेकडून पीएफ खात्यात जमा झाला की नाही याविषयीचा एसएमएस नोंदणीकृत मोबाईलवर ही मिळतो. जर तुमच्या नियोक्त्याने अथवा मालकाने दरमहा पीएफ खात्यात योगदान दिले नसेल तर काय करावे असा प्रश्न पडला असेल तर कर्मचाऱ्याला मालकाविरुद्ध तक्रार दाखल करता येते.
नियोक्ता तुमचे योगदान खात्यात जमा करत नसेल तर कर्मचाऱ्याला थेट ईपीएफओकडे तक्रार दाखल करता येते. ईपीएफओ या तक्रारीची दखल घेऊन प्रकरणाची सखोल चौकशी करतो. तक्रारीत तथ्य आढळल्यास तो नियोक्ताला निश्चित केलेली रक्कम तुमच्या पीएफ खात्यातजमा करण्याचे निर्देश देतो. बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांचे शोषण करण्यात येते. पीएफच्या नावाखाली रक्कम वसूल करण्यात येते. परंतू, ती रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यात टाकण्यात येत नाही. या प्रकरणात नियोक्त्याविरोधात थेट फौजदारी खटला दाखल करण्यात येऊन कठोर कारवाई करण्यात येते.
नियोक्ता पगारातून पीएफच्या नावाखाली रक्कम कपात करत असेल आणि ती जमा करत नसेल तर, कर्मचाऱ्याला या फसवणुकीविरोधात भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कमिशनरसोबतच पोलिसांकडे ही दाद मागता येते. अशा प्रकरणात मालकाविरुद्ध पोलिसात फौजदारी कलमान्वये गुन्हाही दाखल करता येतो. EPFO च्या कलम 14- ब अन्वये नुकसान भरपाई वसूल करण्याचे अधिकारही संघटनेला आहेत.
ईपीएफओच्या नियमांनुसार, नियोक्ता, मालक अथवा कंपनीला वेतन अदा केल्याच्या पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत पीएफ खात्यात योगदान देणे बंधनकारक आहे. जर एखादा मालक जुलै महिन्याचा पगार 1 ऑगस्ट रोजी देत असेल तर त्याला त्या महिन्याच्या पीएफची रक्कम 15 ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करावी लागेल. त्याने असे न केल्यास कर्मचाऱ्याला त्याच्याविरोधात तक्रार दाखल करता येते.