नवी दिल्ली : भारतीयांचे सुवर्णप्रेम जगविख्यात आहे. किडूकमिडूक करण्याची भारतीयांची परंपरा त्यांना कायम मदत करते. सोने हे संकट काळात उपयोगी पडते. पण आता एक मोठे संकट आले आहे. जर घरातील सोन्याची दागिने हॉलमार्क (Hallmark Jewellery) नसतील तर त्यांची विक्री करता येणार नाही. घरातील जुन्या दागिन्यांवर हॉलमार्क नव्हताच. त्यामुळे गरजेच्यावेळी ही दागिने कशी विक्री करणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. हॉलमार्किंगचा नवीन नियम (Hallmark New Rules) 1 एप्रिल, 2023 रोजीपासून लागू करण्यात आला आहे. हा नियम अनिवार्य आहे. त्यामुळे घरात पडून असलेल्या विना हॉलमार्क दागिन्यांची विक्री करता येणार नाही आणि नवीन सोने खरेदी करताना एक्सचेंज सुद्धा करता येणार नाही.
काय सांगतो नवीन नियम
देशभरात 1 एप्रिल, 2023 रोजीपासून हॉलमार्किंगचा नवीन नियम लागू झाला. भारतीय मानक ब्युरोने (BIS) सोन्याच्या शुद्धतेसाठी हा नियम लागू केला. हा नियम सोन्याच्या शुद्धतेची हमी देतो. हा नियम आता सोन्याच्या दागिन्यांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. सोन्याचे दागिने 22 कॅरेट अथवा 18 कॅरेटचे असतात. त्यामुळे घरातील या दागिन्यांचे आता काय होणार असा सवाल विचारला जात आहे.
खरेदीच नाही विक्रीसाठी पण हॉलमार्क अनिवार्य
बीआईएस नुसार, ज्या ग्राहकांकडे सध्या विना हॉलमार्कची सोन्याची दागिने आहेत, ते त्याची विक्री करु शकत नाही. मग आता घरातील दागिन्यांची कधीच विक्री करता येणार नाही की काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का? तर असे नाही यावर एक पर्याय देण्यात आला आहे. हा पर्याय वापरल्यास तुम्हाला घरातील विना हॉलमार्कचे दागिने विक्री करता येतील.
हा करा उपाय
बीआयएसने यासाठी एक पर्याय दिला आहे. त्यानुसार, जुने दागिने विक्री करायचे असतील तर बीआयएस रजिस्टर्ड सोनाराकडे द्यावे लागतील. याठिकाणी तुम्हाला जुने दागिने हॉलमार्क करुन मिळतील. तसेच बीआयएसने काही ठिकाणी हॉलमार्किंग केंद्र सुरु केले आहेत. या ठिकाणी जाऊन जुने दागिने हॉलमार्क करता येतील. त्यासाठी 45 रुपयांचे शुल्क अदा करावे लागेल.
हॉलमार्किंग सेंटरचा पर्याय
जर घरात विना हॉलमार्क दागिने असतील तर बीआयएस मान्यता प्राप्त हॉलमार्किंग सेंटरवर जाऊन दागिन्यावर हॉलमार्किंग करता येईल. या ठिकाणी प्रत्येक दागिन्यामागे 45 रुपये खर्च होईल. तर चारहून अधिक दागिन्यांसाठी 200 रुपयांचे शुल्क मोजावे लागेल.
खरे सोने असे ओळखा
सोन्याची दागिन्यांची खरेदी करताना त्यावरील BIS हे चिन्ह जरुर तपासा. हे चिन्ह एका त्रिकोणासारखे दर्शविल्या जाते. तुमच्या दागिन्याच्या बिलावर हॉलमार्किंगचे मूल्य, किंमत जरुर तपासा. त्यानुसार, तुम्हाला किती कॅरेटचे सोने मिळाले. तुम्ही खरेदी केलेले सोने किती शुद्धतेचे आहे, हे समोर येईल. सोन्याच्या घडवणीसाठी आणि शुद्धतेसाठी तु्म्ही किती रुपये मोजले हे तुमच्या लक्षात येईल. सोने खरेदी करताना ते कमीत कमी 22 कॅरेट शुद्धतेचे असणे आवश्यक आहे. देशात आता सोने आणि दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे.