नवी दिल्ली : गुंतवणूक करण्यासाठी प्रत्येकाची एक रणनीती असेत. प्रत्येक जण भविष्यासाठी, काळजीपोटी गुंतवणूक करतो. या गुंतवणुकीतून (Investment) तगड्या फायद्याची अपेक्षा करतो. काहींना कुठलीही जोखीम नको असते, पण परतावा चांगला हवा असतो. तर काही जण जोखीम घेत अधिक परतावा मिळवितात. त्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक योजनेत पैसा टाकतात. तर आवर्ती ठेव योजना आणि पद्धतशीर गुंतवणूक योजना या दोन पर्यायापैकी कोणता पर्याय गुंतवणूकदारांसाठी चांगला राहील असा प्रश्न अनेकांना पडतो. आवर्ती ठेव (Recurring Deposit) मध्ये हमखास परतावा मिळतो. तर पद्धतशीर गुंतवणूक योजना (Systematic Investment Plan) ही शेअर बाजाराशी संबंधित असते. पण या योजनेत जोरदार परतावा मिळत असल्याने, तसेच कमी पैशातही यामध्ये गुंतवणूक करता येत असल्याने ही योजना लोकप्रिय झाली आहे.
जर तुम्ही दर महिन्याला जवळपास 2000 रुपयांची गुंतवणूक करु इच्छित असाल तर पोस्टाची RD आणि म्युच्युअल फंडातील SIP यापैकी कोणता पर्याय असेल? तुमच्या मनात याविषयी संभ्रम असेल तर या दोन्ही योजनांचे फायदे तुम्हाला तपासता येतील . फायदे आणि तुमची रणनीती यांची सांगड घालून तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करता येईल. यापैकी एक योजना निवडता येईल.
पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव योजना ( RD ) पाच वर्षांसाठी असते. पण या योजनेत तुम्हाला कालावधी वाढविता येतो. पाच वर्षे ही योजना पुढे वाढविता येते. सध्या आरडीवर 5.8 टक्के व्याज मिळते. पोस्ट ऑफिसच्या RD Calculator च्या हिशेबाने आरडीत दरमहा 2000 रुपयांची गुंतवणूक केल्यास वर्षाला 24,000 रुपये तर पाच वर्षानंतर एकूण 1,20,000 रुपये जमा होतात. या आवर्ती ठेवीवर 19,395 रुपयांचं व्याज मिळते. मॅच्युरिटीवर एकूण 1,39,395 रुपये मिळतात.
जर तुम्ही अजून या योजनेत बचत सुरु ठेवली. पुढील आणखी पाच वर्षे तुम्ही दरमहा 2000 रुपये गुंतवले तर त्याचा फायदा होईल. योजनेनुसार, 10 वर्षांत एकूण 2,40,000 रुपये गुंतवणूक होईल. त्यावर तुम्हाला 85,295 रुपयांचे व्याज मिळेल. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला या योजनेवर एकूण 3,25,295 रुपये मिळतात. तेही विनाजोखीम, कुठलाही धोका न घेता.
जर तुम्ही योग्य म्युच्युअल फंडची निवड केली. त्यात गुंतवणुकीचा निर्णय घेतला तर तुमचा फायदा होईल. त्यासाठी एसआयपी हा चांगला पर्याय ठरेल. तुमचा पैसा थेट शेअर बाजारात गुंतवण्यापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणे अधिक फायदेशीर राहील. म्युच्युअल फंडमध्ये जोखीम कमी आणि फायदा अधिक असतो. अनेक म्युच्युअल फंड कमीत कमी 12 टक्क्यांचा परतावा देतात. तसेच तुम्हाला कम्पाऊंडिंग व्याजाचा फायदा ही मिळतो. पण ही जोखीमयुक्त गुंतवणूक असते.
जर तुम्ही SIP च्या माध्यमातून दर महा 2000 रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षानंतर 1,20,000 रुपयांची गुंतवणूक होईल. त्यावर कमीत कमी 12 टक्के व्याजाचा हिशोब गृहीत धरल्यास 44,973 रुपये व्याज मिळेल. म्यॅच्युरिटीवेळी तुम्हाला एकूण 1,64,973 रुपये मिळतील. पुढे अजून पाच वर्षे या योजनेत गुंतवणूक केल्यास एकूण 2,40,000 रुपये जमा होतील. त्यावर कमीत कमी 12 टक्के व्याज मिळेल. व्याजाची रक्कम 2,24,678 रुपये इतकी असेल. एकूण तुम्हाला 4,64,678 रुपये परतावा मिळेल. आरडी पेक्षा एसआयपी कधीही फायदेशीर ठरते. पण त्यासाठी तुमची जोखीम घेण्याची तयारी असावी लागते.