मुंबई, जास्त काळासाठी जेव्हा आपण घराबाहेर निघतो तेव्हा आपला मोबाईल (Mobile Discharge) सहसा पूर्ण चार्ज केला असल्याची खात्री नक्कीच करतो. बरेच जण ऑफिसला जाण्यासाठी किंवा इतर प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात. रेल्वेने प्रवास (train Journey) करीत असताना तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत असल्याचा अनुभव तुम्ही घेतला आहे काय? रेल्वे प्रवासात जर तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत असेल तर यासाठी तुमच्या फोनला अजिबात दोष देऊ नका, कारण यात मोबाईलची काहीच चूक नाही. असे घडण्यामागे काही वेगळे कारण आहे.
प्रवास करताना मोबाईलची बॅटरी लवकर संपते आणि हे नेटवर्क व डेटा प्रोव्हायडरमुळे होते. जेव्हाही तुम्ही बराच काळ प्रवास करत असाल, मग तुम्ही ट्रेन, बस किंवा कारने प्रवास करत असाल, त्या काळात तुमच्या फोनवर उपलब्ध असलेले नेटवर्क वारंवार बदलत राहते. प्रवासात, आपला फोन वारंवार नेटवर्क बदलतो आणि जवळचे नेटवर्क शोधतो आणि त्यातून नेटवर्क घेतो. पण प्रवासात सापडलेले हे नेटवर्क काही काळापुरतेच राहते, कारण प्रवास करताना आपण पुढे जातो आणि आपला फोन पुन्हा पुन्हा असे नेटवर्क बदलत राहतो. नवीन नेटवर्क शोधण्यासाठी मोबाईलवर अतिरिक्त ताण येतो ज्यामुळे जास्त बॅटरी लागते.
प्रवासादरम्यान प्रत्येकजण फोन वापरतो. फोनमध्ये साठवलेला जुना देता पाहण्याचा काळ आता गेला आहे. फास्ट इंटरनेट उपलब्ध असल्याने प्रत्येकजण रिकाम्या वेळेत इंटरनेटचाच वापर करतो. त्यामुळे नवीन काही पाहण्यासाठी इंटरनेट असणंही आवश्यक आहे. पण, तुमच्या लक्षात आले असेल की जर तुम्ही प्रवासात इंटरनेट वापरत असाल तर फोनची बॅटरी लवकर संपते, कारण अशावेळी फोनला डेटा प्रोव्हायडर वारंवार बदलत राहावे लागते. त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये जीपीएस सुरु असते त्यामुळे देखील फोनची बॅटरी लवकर संपते.