नवी दिल्ली : सध्या रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक सुरू आहे. आज या बैठकीचा शेवटचा दिवस आहे. या बैठकीला तीन ऑगस्टपासून सुरुवात झाली होती. बैठक संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये चलनविषयक धोरण समितीने जे निर्णय घेतले आहेत त्या निर्णयाची माहिती ते देणार आहेत. आरबीआयच्या या बैठकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा रेपो रेट (Repo rate) वाढीबाबतची घोषणा होऊ शकते. चालू वर्षात रिझर्व्ह बँकेकडून आतापर्यंत दोनदा रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता आज तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली जाऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. रेपो रेटमध्ये वाढ केल्यास त्याचा फटका हा सामान्य नागरिकांना बसणार आहे. विविध कर्जाच्या व्याज दरात तर वाढ होणारच आहे. मात्र सोबतच ईएमआयमध्ये देखील वाढणार आहे.
दरम्यान यापूर्वी चालू आर्थिक वर्षात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये दोनदा वाढ करण्यात आली आहे. मे महिन्यात आरबीआयने रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. तर जूनमध्ये देखील 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. अशाप्रकार चालू आर्थिक वर्षात आरबीआयने रेपो रेटमध्ये 90 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. सध्या रेपो रेट 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर सरकारी बँकांसह खासगी बँकांनी देखील आपल्या कर्जाच्या व्याज दरात वाढीचा धडाका लावल्याने कर्ज महाग झाले आहे. सोबतच काही बँकांनी एफडीवरील व्याज दरात देखील वाढ केली आहे. विविध कालावधींच्या एफडीच्या व्याज दरात वाढ करण्यात आली आहे.
देशात सध्या महागाई सर्वोच्च स्थरावर पोहोचली आहे. महागाई कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने देखील व्याज दरात वाढ केली आहे. भारताने दोनदा रेपो रेट वाढवले आहेत. मात्र महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता तिसऱ्यांदा रेपो रेट वाढण्याची शक्यता आहे. आज रेपो रेटमध्ये 35 ते 50 बेसिस पॉईंटच्या वाढीची शक्यता आहे.