बाल्कनीत बसून दिनेश पाटील चहाचा आनंद घेत होते. तेवढ्यात त्यांच्या मित्राचा मुलगा राहुल आला. राहुल नुकताच एका खासगी विमा कंपनीत एजंट म्हणून रुजू झाला आहे. चहा पीत – पीत राहुलनं विमा पॉलिसीबद्दल (Insurance policy) मोठ मोठ्या गोष्टी सांगितल्या आणि एक पॉलिसीही विकली. काही दिवसानंतर खरेदी केलेली विमा पॉलिसी ही बिनकामाची असल्याचं दिनेश पाटील यांच्या लक्षात आलं. ही गोष्ट केवळ दिनेश यांचीच नाही. देशभरात मोठ्या प्रमाणात नको असलेल्या पॉलिसी ग्राहकांच्या (Customer) माथी मारल्या जातात. विमा व्यवसायात खासगी कंपन्यांच्या प्रवेशामुळे मोठी स्पर्धा निर्माण झालीये. विमा पॉलिसी विकण्यासाठी एजंटवर मोठा दबाव असतो. विक्रीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी एजंट बऱ्याच वेळेस ग्राहकांना नीट माहितीही देत नाहीत. बऱ्याचदा ग्राहकांना नको असलेली पॉलिसी माथी मारली जाते. अशावेळी पॉलिसीमधील वैशिष्ट्यांची माहिती होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अनेकदा एजंट ओळखीचा किंवा नातेवाईक असल्यानं तक्रारही करता येत नाही. अशा निरुपयोगी पॉलीसीचं काय करावं हा मोठा प्रश्न पडतो. पॉलिसी कायम ठेवल्यास आर्थिक नुकसान सोसावं लागतं. अशा पॉलिसीत विम्याचे (Insurance) कवचही फारसं नसतं.
अशा स्थितीत ग्राहक कोंडीत सापडतो. अशा पॉलिसीमध्ये आणखी गुंतवणूक करण्यात शहाणपणा नाही. शक्य तितक्या लवकर अशा पॉलिसीतून बाहेर पडणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. एखाद्या विमा पॉलिसीमधील अटी आणि शर्ती तुम्हाला खटकल्या असतील तर तुम्ही पॉलिसी परत करू शकता. अशी सुविधा पारंपारिक विमा आणि युलिपवर मिळते. मात्र, पॉलिसी ठराविक कालमर्यादेत परत करावी लागते. निर्धारित कालमर्यादेत पॉलिसी परत केल्यास कोणतीही कपात न होता संपूर्ण प्रीमियम परत मिळतो. निरुपयोगी पॉलिसीतून बाहेर पडण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
विमा कंपन्या पॉलिसीची समिक्षा करण्यासाठी वेळ देतात. जर एखादी पॉलिसी तुम्हाला चुकीच्या पद्धतीने विकली गेली असेल, किंवा तुम्हाला पॉलिसी उपयोगाची वाटत नसेल, तर तुम्ही पॉलिसी परत करू शकता. ही प्रक्रिया तुम्हाला पॉलिसी खरेदी केल्यानंतर 15 दिवसांत पूर्ण करावी लागते. या कालावधीत तुम्ही पॉलिसीमधून बाहेर पडल्यास, तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही. या कालावधीला पॉलिसीचा ‘फ्री लुक पीरियड’ म्हणतात. काही कंपन्या एक महिन्याचा फ्री लुक पिरियड देतात. पॉलिसीच्या कागदपत्रांसह विमा कंपनीच्या शाखेला भेट द्या आणि संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा. यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. कंपनीचे अधिकारी तुमच्यावर कायदेशीर दबाव आणू शकत नाहीत. कागदपत्र पूर्तता केल्यानंतर विमा कंपनी तुमचा प्रीमियम परत करते. पॉलिसी घेऊन खूप दिवस झाले असतील म्हणजेच फ्री लूक कालावधीचा लाभ घेता येत नाही. अशावेळी निरुपयोगी पॉलिसीतून बाहेर कसं पडाल? तर अशावेळी तुम्ही पॉलिसी लॅप्स म्हणजेच रद्द करू शकता. यासाठी पॉलिसीची पुढील प्रीमियम भरू नका, पॉलिसी लॅप्स केल्यानंतर त्याबदल्यात तुम्हाला कोणताही परतावा मिळणार नाही. सुरुवातीला भरलेले हप्ते बुडतात आणि तुम्हाला कोणताही विमा कवच सुद्धा मिळत नाही.