नवी दिल्ली : केंद्र सरकारने या 1 एप्रिल 2023 रोजीपासून देशातील सोन्याच्या दागिन्यांवर, आभुषणांवर हॉलमार्क (Hallmark Gold) अनिवार्य केले आहे. शुद्ध सोन्याच्या हमीसाठी आणि ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) हे पाऊल टाकलं आहे. पण प्रत्येक नियमाला अपवाद असतोच की आणि चकाकतं ते सारंच काही सोनं नसतं! हॉलमार्किंगच्या आडून ही सोनार गंडा घालत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे. सोनाराची चालाखी या एका ट्रिकने पकडली जाऊ शकते, घरच्या घरीच काय, तुम्ही थेट सराफा दुकानदारालाच आरसा दाखवू शकता
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
धैर्य अंदानी या तरुणाने Instagram,Facebook वर पोस्ट केलेला हा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओत धैर्यने त्याची सोने खरेदीत कशी फसवणूक झाली आणि ती त्याने कशी शोधली याची माहिती आहे. सोनार कशी चालाखी करतात आणि ग्राहकांना गंडवितात, याची माहिती धैर्यने त्याच्या व्हिडिओत दिली आहे. त्याने ही फसवणूक ओळखण्यासाठी खास ट्रिकही सांगितली आहे.
कशी होते फसवणूक
सराफा असा घालतो गंडा
सराफा दुकानदार तुम्हाला हॉलमार्किंगमध्ये पण गंडवितो. या तरुणाने व्हिडिओत याविषयीचा दावा केला आहे. त्यानुसार, त्याने सोने 22 कॅरेट सोने खरेदी केले. सोन्याच्या अंगठीवर 22 कॅरेट चिन्हांकित पण केलेले आहे. पण तरीही त्याची सोनाराने चालाखीने फसवणूक केली. तुमच्याबाबतीत पण अशीच फसवणूक होऊ शकते. तेव्हा सावध रहा.
अशी ओळखा फसवणूक
तुम्ही सोनं खरेदी केल्यानंतर त्यावर हे सोनं किती कॅरेटचं आहे, याची माहिती देण्यात येते. हे सोनं 18 Carat, 22 Carat अथवा 24 Carat किती आहे, त्यावर चिन्हांकित असते. त्याआधारे आपण सराफा दुकानदाराला पैसे देतो. यामध्येच फसवणूक होते. दुकानदार 22 कॅरटंच सांगून 18 कॅरटंच सोनं माथी मारतो. दुकानदाराची ही चालाखी तुम्ही पण पकडू शकता.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.