नवी दिल्ली : ट्रेनमध्ये प्रवास (Train Journey) करताना उशी, चादर, पांघरुणाचे कपडे दिले जातात. दूरच्या प्रवासात स्लीपर कोचमध्ये या सुविधा देण्यात येतात. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना त्रास होत नाही. पण काही प्रवासी या सुविधेचा गैरफायदा घेतात. काही जण उशी चोरतात तर काही चादर तर कोणी इतर काही साहित्य आपलेच समजून घरी घेऊन जातात. पण त्याचा फटका रेल्वे खात्याला (Indian Railway) बसतो. कारण या वस्तू, सामान केवळ उपयोगासाठी देण्यात येते. ते घरी घेऊन जाण्यासाठी देण्यात येत नाही. आता यापुढे तुम्ही गंमत म्हणून जरी अशी कृती केली तर त्याचा तुम्हाला जबरी दंड सहन तर करावाच लागेल पण तुम्हाला तुरुंगाची हवा पण खावी लागू शकते.
चोरीचे प्रकार वाढले
भारतीय रेल्वे विभाग एसी कोचसाठी उशी, चादर आणि इतर वस्तू देते. या वस्तू प्रवाशी चुपचाप त्यांच्या घरी घेऊन जातात. त्यामुळे रेल्वे खात्याला नाहक भूर्दंड सहन करावा लागतो. यात्रेकरुंच्या या असभ्य वर्तनाने रेल्वे विभागाला लाखो रुपयांचा चूना बसतो. चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे नुकसान वाढत चालले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील विलासपूर झोनमध्ये चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये चादर, अंगावरील पांघरुण, उशी, उशीचे कव्हर, टॉवेल आणि इतर सामानाची चोरी वाढली आहे.
ठेकेदारांचे दुर्लक्ष
भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवासात सुविधा पुरविण्याचे कंत्राट काही खासगी कंत्राटदारांना दिले आहे. पण या कंपन्यांच्या दुर्लक्षामुळे रेल्वे विभागाला फटका बसत आहे. उशी, चादर आणि इतर सामान या कंत्राटदारांना मोजून देण्यात येते. पण परत करताना यातील बरेच सामान गहाळ होत असल्याचे दिसून आले आहे. या ठेकेदार कंपन्या वेळीच याकडे लक्ष देत नसल्याने या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होत आहे. हे सामान खरेदीसाठी त्यांना सातत्याने खर्च करावा लागत आहे.
तर होईल जेल
प्रवाशाच्या बॅग अथवा इतर लगेजमध्ये भारतीय रेल्वेच्या वस्तू, सामान आढळल्यास आता त्यांची खैर नाही. अशा प्रवाशांवर रेल्वे विभाग कडक कारवाई करणार आहे. रेल्वे मालमत्ता अधिनियम 1966 अंतर्गत प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल. या अधिनियमांच्या तरतुदीनुसार कमीत कमी 5 वर्षांची शिक्षा होईल. तसेच जबरी दंड ही त्याच्याकडून वसूल करण्यात येईल. न्यायालय याप्रकरणी जी शिक्षा देईल, त्यानुसार पुढील प्रक्रिया होईल.