2 वर्ष कशाला, 2 दिवसात राजीनामा देतो, एकदाचा खेळ होऊन जाऊ द्या’ अब्दुल सत्तार यांचं आव्हान…

| Updated on: Oct 29, 2022 | 5:37 PM

नंदुरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

2 वर्ष कशाला, 2 दिवसात राजीनामा देतो, एकदाचा खेळ होऊन जाऊ द्या अब्दुल सत्तार यांचं आव्हान...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नंदूरबारः आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणतात दोन वर्षानंतर पाहू, कोण जिंकतो, पण मी त्यांना आव्हान देतो दोन दिवसात राजीनामा देतो. एकदाचा खेळ होऊन जाऊ देत. दूध का दूध.. पानी का पानी होऊ देत… सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार (Abdul Sattar) काय आहे आणि वरळीत आदित्य ठाकरे काय आहेत, हे लोकांना कळू देत, असं आव्हान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलंय. नंदूरबारमध्ये ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंएवढी (Eknath Shinde) लोकप्रियता फार कमी लोकांना मिळते. त्यामुळे काही लोकांना पोटशुळ उठतंय. नंबर दोनचे पप्पू बोलले. राजीनामा द्या… त्यांना मीच आव्हान देतो, असं सत्तार म्हणाले.

नंदुरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस राज्यातले मंत्री अब्दुल सत्तार, डॉक्टर विजयकुमार गावित, दादा भुसे, गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलं.

कालपासून अब्दुल सत्तार हे आदित्य ठाकरे यांना उद्देशून ‘छोटा पप्पू’… ‘दोन नंबरचा पप्पू’ असे शब्द वापरत आहेत. आजदेखील त्यांनी याच शब्दाचा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधाला. शिवसेना कार्यकर्त्यांकडून याचा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय.

अब्दुल सत्तार हे  बेताल वक्तव्य करत आहेत, असा आरोप करत  जळगावात निषेध करण्यात आला. आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीतर्फे जळगावच्या टावर चौकात बोंबाबोंब आंदोलन करून अब्दुल सत्तार यांचे पोस्टर फाडण्यात आले. त्याच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. याप्रसंगी जाकीर पठाण यांनी सत्तार यांच्यावर कडाडून टीका केली. या आंदोलनात पक्षाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.