मुंबईः दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलंय. राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आम्ही लवकरच राज्यपालांकडे ही भूमिका मांडणार आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी या ईडीच्या भाजपच्या सरकारने घेतली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही राज्यपालांकडे जाणार आहोत, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील मालाचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जास्त झळ सोसावी लागत आहे.
मात्र एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा एक रुपयादेखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही, असा आरोप नाना पटोले यांनी याधीही केला आहे.
राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी याआधीही लावून धरली होती. दिवाळीपर्यंत राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची रोख मदत आणि नंतर 10 हजार हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा केला होता.
पण सध्याचं सरकारने नियमांचे अडथळे निर्माण करून शेतकऱ्यांना मदत देत नाहीये. शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे पण शिंदे-भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केलाय.