अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ढपला? ठाकरे गटाचा मोठा आरोप; कोण कोणत्या मंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार?
याच्याआधी असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेला होता. त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडूनही असा आरोप करण्यात आलेला आहे.
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या अनेक मंत्र्यांवर सध्या भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप होत आहेत. त्यावरून मविआच्या नेत्यांनी सतत सरकारला प्रश्न विचारले आहेत. तर आता देखील ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्यानं राज्यात विविध विभागात अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. याच्याआधी असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेला होता. त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडूनही असा आरोप करण्यात आलेला आहे. त्यांनी महसूल विभाग, कृषी विभाग, वन विभाग झालेल्या बदल्यांवरून सरकारवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. महसूल विभागातील 66 अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. या बदल्यांचे रात्री 4 वाजता आदेश निघाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या बदल्यांचे आदेश हे वेबसाईटवर न नमूद होता, त्या बदल्यांची माहिती ही व्हॉट्सअपला पाठविण्यात आली होती. त्यामुळे या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याने त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे.