अमरावतीः खोके सरकारचे आरोप करणाऱ्या रवी राणा (Ravi Rana) यांनी माफी मागितल्यानंतरही मै झुकेगा नही… हा बाणा बच्चू कडू (Bacchu Kadu) कायम ठेवणार का, अशी चर्चा आहे. कारण आहे, अमरावतीत लागलेले मोठ-मोठे पोस्टर्स (Banners). आज प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा अमरावतीत आयोजित करण्यात आला आहे. रवी राणा यांच्या माफीनंतरही आपण कोणती भूमिका घेणार, हे बच्चू कडू यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलंय.
अमरावतीत नेहरू मैदान येथे आज प्रहार जनशक्ती संघटनेचा मेळावा होत आहे. येथे बच्चू कडू यांचे मोठ-मोठे बॅनर्स लावले आहेत. त्यावर मै झुकेगा नही… असे लिहिले आहे.
तसेच व्यासपीठावरील एका मोठा बॅनरवर बच्चू कडूंचा एक फोटो अधिक चर्चेत आहे. या फोटोसमोर मोठा हातोडा दाखवण्यात आला आहे. हजार कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. यातून शिंदे-फडणवीस सरकारला नेमका काय संदेश देणार आहेत, याची चर्चा सुरु आहे.
खोके अर्थात पैसे आमदारांनी सरकार स्थापन केल्याचा आरोप अमरावतीचे भाजप आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यालाच बच्चू कडू यांनी आव्हान दिलं होतं. आम्ही पैसे घेतले तर ते कुणी दिले, फडणवीसांनी दिले का? तसं असेल तर ते सिद्ध करा, अन्यथा जाहीर माफी मागा, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली होती.
ही माझीच नाही तर शिंदे गटातील सगळ्याच आमदारांची बदनाही आहे, असे बच्चू कडू म्हणाले होते. दरम्यान, सोमवारी शिंदे-फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांची माफी मागितली.
त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करू, असे बच्चू कडू म्हणाले होते. खोक्यांच्या आरोपासंदर्भात आता फार चर्चा करणार नाही, मात्र विकासाच्या तसेच अपंगांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पुढील भूमिका स्पष्ट करू, असे बच्चू कडू मंगळवारी सकाळी म्हणाले.
दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी तरी मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे. त्यासाठीच हे दबावतंत्र असल्याची चर्चा सुरु आहे.