अंधेरीचा गड कुणाचा? दोन्ही उमेदवारांचा आत्मविश्वास पाहा Video!

| Updated on: Oct 14, 2022 | 10:27 AM

या निवडणुकीत जवळपास 30 हजार मताधिक्याने आम्ही जिंकू, असं वक्तव्य मुरजी पटेल यांनी केलंय.

अंधेरीचा गड कुणाचा? दोन्ही उमेदवारांचा आत्मविश्वास पाहा Video!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः अंधेरीचा (Andheri East By poll) गड कुणाचा, याचं उत्तर काही दिवसातच मिळणार आहे. पण तोडीस तोड असलेले उमेदवार आज अर्ज भरतायत. ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि भाजपकडून (BJP) यावेळी मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाईल. तत्पुर्वी दोन्ही उमेदवारांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिल्या. त्यावरून ही निवडणूक अधिकच चुरशीची होईल, असं दिसतंय.

महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या उमेदवारी अर्ज भरत आहेत. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऋतुजा लटकेंसमोर प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या.

मात्र ऋतुजा लटकेंनी मतदारांना आवाहन केलंय. आम्ही एकनिष्ठ आहोत. महाराष्ट्रात किंवा मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशिवाय पर्याय नाही. आपल्याला रेकॉर्ड ब्रेक विजय खेचून आणायचा आहे. निवडणूक आपण विक्रमी मतांनी जिंकणार, अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी दिली आहे.

तर भाजपचे मुरजी पटेल यांनीही आत्मविश्वासपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. गड हा फक्त शिवाजी महाराजांचा आहे. एवढं मला माहिती आहे. 3 तारखेला मतदान होईल आणि 6 तारखेला कळेल कुणाचा गड आहे.

पहा दोन्ही उमेदवारांच्या प्रतिक्रिया

अंधेरी पूर्वची जनता… आम्ही एक परिवार म्हणून राहतो. या निवडणुकीत जवळपास 30 हजार मताधिक्याने आम्ही जिंकू, असं वक्तव्य मुरजी पटेल यांनी केलंय.

अंधेरी पूर्व मतदार संघाची पोटनिवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. 03 नोव्हेंबर रोजी यासाठी मतदान होईल. तर 06 नोव्हेंबर रोजी निवडणुकीची मतमोजणी होईल.