मुंबईः पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या सुनावणीनंतर राज्यभर ठाकरे (Thackeray) गटाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. कोकणातले शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनीही या प्रसंगी आनंदाची प्रतिक्रिया दिली. अन्यायाविरोधात कसं लढायचं, याचा आदर्श संजय राऊत यांनी घालून दिलाय.
तो सर्वांनी घेतला पाहिजे. कोणत्याही दबावाला राऊत यांनी भीक घातली नाही. ते झुकले नाहीत, असं भास्कर जाधव म्हणाले. भास्कर जाधव यांनी यावेळी संजय राऊत यांनी जेलमधून लिहिलेल्या पत्राचा प्रथमच उल्लेख केला.
ते म्हणाले, ‘ 28 ऑगस्टला माझी आणि अरविंद सावंत यांची शिवसेना उपनेतेपदी निवड झाली.. त्यावेळेला संजय राऊतांचं जेलमधून पत्र आलं होतं. या पत्राबद्दल मी पहिल्यांदाच बोलतोय…
त्यात राऊत यांनी लिहिलं होतं.. खोटे नाटे आरोप करून मला जेलमध्ये टाकलंय. शिवसेना प्रमुखांची शिवसेना अडचणीत आणण्याचं काम झालं.
मी माझ्या परीने त्याच्या विरोधात लढलो, तुम्ही तुमच्या परीने लढत आहात. आज मी जेलमध्ये आहे. तुम्ही अशा प्रसंगी शिवसेनेची साथ सोडू नका. उद्धव साहेबांची साथ सोडू नका…
हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेऊ नका. मी लवकरच बाहेर येईन आणि तुमच्यापुढे या लढाईत उतरेन. आज तो दिवस आलाय. संजय राऊत येजलमधून बाहेर येणार आहेत.
सत्य परेशान हो सकता है.. लेकिन पराजित नही हो सकता. म्हणून आज आमच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. अशाच पद्धतीने जे जे लोक जेलमध्ये आहेत, ते बाहेर पडतील. हे षडयंत्र ज्या लोकांनी रचलंय. त्याविरोधात ते ताकतीने उभे राहतील. ते अधिक ताकतीने लढतील, असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
मी झुकणार नाही, हे त्यांनी खरं करून दाखवलं. अन्यायाविरोधात कसं लढायचं, याचा आदर्श संजय राऊत यांनी घालून दिलाय, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय.