राजीव गिरी, नांदेडः शिंदे-फडणवीस (Shinde -Fadanvis) सरकार पडण्याच्या चर्चांना राज्यात उधाण आलंय. यातच राष्ट्रवादी, शिवसेना (Shivsena) नेत्यांनी सरकारला धोका असल्याचं भाकित केलंय. आता तर थेट भाजपच्या (BJP MLA) नेत्यानेच असं काही वक्तव्य केलंय की भाजप जणू काही प्लॅन बी ची तयारी करतंय. गिरीश महाजन यांनी नांदेडमध्ये यासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले, ‘ राज्यभरातले अनेक नेते भाजपात येण्याच्या मार्गावर आहेत. संपर्कातही आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, आता मी नावं कोट करणार नाही. फक्त या जिल्ह्यातलेच नाहीत. तर महाराष्ट्रातून अनेक लोकं, बडे मंडळी… आपल्या पक्षाचं भवितव्यं काय हे, ज्यांना कळतंय. त्यांना बऱ्याच जणांना भाजपात येण्याची इच्छा आहे.
काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्याच नांदेड जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. फक्त याच जिल्ह्यातून नव्हे तर राज्यभरातून नेते संपर्कात आहेत, असे म्हटल्याने भाजपा आता काँग्रेसला खिंडार पाडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
औरंगाबादमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनीही मोठं वक्तव्य केलंय. शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा प्लॅन तयार ठेवलाय.
शिंदे गटाचे 16 आमदार बाद होण्याची भीती असल्याने काँग्रेसचे 22 आमदार फडणवीस यांनी गळाला लावले आहेत. फडणवीस तसे हुशार आहेत, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय.
त्याआधी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डी येथील अधिवेशन संपल्यानंतर शिंदे सरकार कोसळणार असं भाकित केलंय. त्यामुळे राज्यात सध्या शिंदे सरकार कोसळण्याच्या चर्चांनी चांगलाच जोर पकडल्याचं चित्र आहे.