जळगावः सुषमा अंधारे (Sushama Andhare) या राष्ट्रवादीतून (NCP) आलेलं पार्सल आहे आणि उरली सुरली शिवसेनादेखील त्या संपवून टाकतील. ठाकरे गटानं सावध व्हावं असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिलाय. जळगावचे शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेनेत नुकत्याच आलेल्या सुषमा अंधारे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे हस्तक असून शिवसेनेच्या स्थितीसाठी तेच जबाबदार असल्याची टीका वारंवार केली जाते. आता उरली सुरली शिवसेना संपवण्यासाठी सुषमा अंधारेंना राष्ट्रवादीने पाठवल्याची जहरी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
सुषमा अंधारे यांची शिवसेनेच्या वतीने महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. काल त्या जळगावमध्ये होत्या. या कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत त्यांच्या भाषणांवर जळगावात बंदी घालण्यात आली. त्यावरून शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे व ठाकरे गटातील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी घडत आहेत.
गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचा धसका घेतला आहे. पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून खोटे गुन्हे दाखल करत आहेत. मात्र आम्ही अशा गुन्ह्यांना भीक घालणार नाहीत, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय.
आम्हाला कसलीही बंदी घातला तरी शिव प्रबोधन यात्रा सुरूच राहील.. या सरकारने माफिया आणि गुंडांना हाताशी धरले आहे, मी बहुजन असल्याने माझ्यावर कारवाई झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय.
तर गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा सुषमा अंधारेंवर टीका केली. ही महाप्रबोधन यात्रा नव्हे तर जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारी यात्रा आहे. हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. उरली सुरली शिवसेना डॅमेज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुषमा अंधारे यांना पाठवल्याची टीका गुलाबराव पाटीव यांनी केली आहे