सर्वपक्षीय नेत्यांना हात जोडून कडकडीची विनंती, जरांगे पाटील यांनी केला वाकून नमस्कार
वर्षानुवर्षाचा लढा आहे. सगळ्या जण मिळून सहकार्य करून योग्य तो मार्ग काढा. पक्ष असो. सत्ताधारी असो की विरोधी असो. सगळेजण आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे मायबाप बना. यांचे पालक बना. एकमताने आरक्षणाचा तोडगा काढा. हात जोडून केलेल्या विनंतीचा मान राखा, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटलं.
जालना, १० सप्टेंबर २०२३ : उद्या सर्वपक्षीय बैठक असेल, तर सर्वपक्षीय नेत्यांना माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे. वाकून सर्वांना नमस्कार करतो. खूप वर्षांपासूनचा हा गोरगरीब पोरांचा लढा आहे. यांच्या नशिबात कोणी आडकाठी घालू नका, असं आवाहन मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील म्हणाले. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांसाठी कसा तोडगा निघेल. यातून कसा मार्ग निघेल. यासाठी उद्या सगळ्यांनी प्रयत्न करावा. तुम्ही आमचे भाऊ आहेत. आम्ही तुम्हाला दादा म्हणतो. मराठ्यांच्या लेकरांसाठी कोणालाही द्वेष पसरू देऊ नका. कडकडीने सांगतो गरिबांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आरक्षणाअभावी एका मुलाची नोकरी गेली, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. कष्ट करून संसार उभा केला असतो. पत्र्याचं घर, गाव, बैलजोडी, भरलेले कपडे, शेत हे नजरेसमोर आणा. फाटलेल्या कपड्यातला बाप. किती कष्ट करतो. तो बाप स्वप्न बघतो. माझ्या मुलाला नोकरी लागणार आहे. माझ्या मुलाला वर्दी मिळणार आहे. चिखलात, पाण्यात, पावसात रात्रंदिवस कष्ट करतो. त्याच्या मुलाकडे सगळ्यांनी एकदा नजर फिरवून बघा, असं कळकळीचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.