‘या’ पाटलांचं आशिष शेलार-पवारांना थेट आव्हान, मुंबईचं लक्ष निवडणुकीकडे!

| Updated on: Oct 11, 2022 | 8:46 AM

शेलार-पवार गटातर्फे आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरला आहे. त्यामुळे एमसीए निवडणुकीत आता आशिष शेलार-संदीप पाटील यांची अध्यक्षपदासाठी निवडणूक रंगणार आहे.

या पाटलांचं आशिष शेलार-पवारांना थेट आव्हान, मुंबईचं लक्ष निवडणुकीकडे!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिनेश दुखंडे, मुंबईः मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Asociation) निवडणुकीत मोठी उलथापालथ झालेली पहायला मिळतेय. काल भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर आज आणखी एक घडमोड समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी या राजकीय गटाला आव्हान देण्याचं ठरवलं आहे. संदीप पाटील यांनी यापूर्वी शरद पवार गटाकडून अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरला होता. मात्र काल पवार-शेलार युती झाल्यानंतर या राजकीय युतीला क्रिकेटपटूंनी आव्हान द्यायचं ठरवलं आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवर राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी शेलार-पवार युती झाली आहे. त्यामुळे संदीप पाटील यांनी आपण स्वतंत्र गटातर्फे निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं.

MCA च्या राजकारणात पहिल्यांदाच झालेल्या शरद पवार-आशीष शेलार यांच्यात युती झाली. त्यानंतर काल माटुंग्यात संदीप पाटील यांनी स्वतंत्र गटाची घोषणा केली.

मुंबई क्रिकेट ग्रुप असं या गटाचं नाव असून त्याच्या बोध चिन्हाचीही घोषणा केली.

याआधी घोषित झालेले शरद पवार गटातील उमेदवार, ज्यांना नव्या पवार-शेलार गटात स्थान मिळू शकले नाही, ते सर्व संदीप पाटील यांच्या मुंबई क्रिकेट गटात असतील.

शेलार-पवार गटातर्फे आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरला आहे. त्यामुळे एमसीए निवडणुकीत आता आशिष शेलार-संदीप पाटील यांची अध्यक्षपदासाठी निवडणूक रंगणार आहे.

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी न्यायालयाने वयाची अट घातल्याने शरद पवार निवडणुकीच्या आखाड्यात थेट उतरू शकले नाहीत. त्यामुळे शेलार यांनी अध्यक्षपदाचा अर्ज भरलाय. तर शेलार-पवार पॅनलतर्फे शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी अपेक्स कौंसिलसाठी स्वतंत्र अर्ज भरला. तर विहंग सरनाईक यांनी एमपीएल म्हणजेच मुंबई प्रीमियर लीगसाठी अर्ज दाखल केला आहे.
उपाध्यक्षपदाची निवडणूक अमोल काळे हे लढवत आहेत. अशा रितीने विविध पक्षांचे नेते मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी एका पॅनलद्वारे निवडणूक लढवताना दिसतील.