टोल माफ करण्याची मागणी आमचीच, उशीरा का होईना सरकारने निर्णय घेतला, अभिनंदन – राज ठाकरे

| Updated on: Oct 16, 2024 | 12:04 PM

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. ही मनसेचीच मागणी होती. उशीरा का होईना पण या गोष्टी समजल्या आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.

Follow us on

आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली . मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी जाहीर करण्यात आली. सोमवारी या निर्णयाची घोषणा केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सातत्याने याबाबत मागणी करण्यात येत होती. अखेर सरकारने ही मागणी मान्य करत मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी देण्याचा निर्णय जाहीर केला. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे.

यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. ही मनसेचीच मागणी होती. हा निर्णय व्हावा म्हणून मनसेच्या सर्व सैनिकांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत,काँग्रेसचं सरकार होतं तेव्हापासून आम्ही ही मागणी केली होती. आपली फसवणूक होत्ये हे लोकांच्या आम्हीच लक्षात आणून दिलं,त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडला. आणि आता मुंबईतील पाचही एंट्री पॉईंट्सवरील टोल बंद झालेत, त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

उशीरा का होईना पण या गोष्टी समजल्या आहेत. मला काळजी फक्त एकाच गोष्टी आहे की निवडणुकीच्या तोंडावर टोलनाके बंद करण्याचा निर्णय घ्यायचा आणि निवडणूक झाल्यावर पुन्हा टोलनाके सुरू करायचे असं चालणार नाही,आणि आम्ही असं होऊ देणारही नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.