Video | खानदान मिटविण्याची जरांगे यांची भाषा शोभते का ? बबनराव तायवाडे यांचा हल्लाबोल
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा जातीच्या स्थितीबद्दलचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आता राज्य सरकारने येत्या 20 आणि 21 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून त्याआधारे मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. परंतू ओबीसीच्या आरक्षणाला कसालाही धक्का लागू नये यासाठी आम्ही देखील लक्ष ठेवून असल्याचे ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.
नागपूर | 18 फेब्रुवारी 2024 : मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. राज्य सरकारने तो स्वीकारला आहे. उद्या किंवा आज तो कॅबिनेटसमोर येईल. त्याच्यानंतर 20 आणि 21 रोजी विशेष अधिवेशनात त्यावर चर्चा होईल आणि वेगळा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याच्या मानसिकतेत सरकार आहे. तरीही ओबीसी आरक्षणाला धक्का तर लागणार नाही ना याकडे आमचे लक्ष असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. मराठा जातीची लोकसंख्या काढताना ज्या जाती आधीच ओबीसीमध्ये आहेत त्यांचा समावेश करुन मराठा जातीची लोकसंख्या ठरविण्यात येऊ नये. ओबीसी जातीतील मराठ्यांचा समावेश करुन जर मराठ्यांना आरक्षण दिले तर आम्हालाही ओबीसी बांधवांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी काल मराठा आरक्षणाविरोधात बोलणाऱ्यांचे खानदान, वंशावळ नष्ट करू अशी खालच्या भाषेत टीका केली आहे. त्याची सरकारने वेळीच दखल घ्यावी असेही आवाहन बबनराव तायवाडे यांनी केले आहे.