नांदेडः राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वातील भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा आज महाराष्ट्रात पोहोचतेय. आज रात्री तेलंगणातून ही यात्रा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश करेल. रात्री 9 वाजेच्या सुमारास भारत जोडो यात्रेचा जथ्था नांदेडमध्ये येईल. नांदेडमध्ये (Nanded) आज पहिली पदयात्रा संपन्न होईल. पुढील जवळपास 14 दिवस राहुल गांधी महाराष्ट्रातील (Maharashtra Congress) विविध जिल्ह्यांतून पदयात्रा काढतील.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर पासून सुरु झाली आहे. आज यात्रेचा 61 वा दिवस आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये ही यात्रा रात्री 9 वाजता प्रवेश करेल.
देगलूरमधील कलामंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यात्रेच्या स्वागताचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने नांदेडमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे.
या कार्यक्रमानंतर 10 वाजता पुन्हा एकदा पदयात्रेला सुरुवात होईल. काँग्रेस सदस्यांच्या हाती यावेळी एकतेची मशाल असेल. देगलूर येथील गुरुद्वाऱ्याला भेट देतील. मंगळवारी वन्नाळी गुरुद्वारा, खतगाव फाटा, भोपाळा, शंकरनगर रामतीर्थ भागातून पुढे नायगाव येथे जाईल.
बुधवारी नायगाव ते वाझिरफाटा, नायगाव येथे मुक्काम असेल. गुरुवारी पिंपळगाव आणि शुक्रवारी नांदेडमधून ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करेल. तर 15 नोव्हेंबर रोजी ही यात्रा वाशिम जिल्हयात पोहोचेल.
10 नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये तर 18 नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर रोजी ही यात्रा मध्यप्रदेशात मार्गस्थ होईल.
काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यात्रेसाठी परिश्रम घेत आहेत.
आदित्य ठाकरे 10 तारखेला राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर उद्धव ठाकरे या रॅलीत सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना नुकताच रुग्णालयातून डिशचार्ज मिळाला आहे. पुढील काही दिवसात ते राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.